मुंबई : शहरी आणि ग्रामीण पातळीवर केलेल्या विविध सर्वेक्षणांत ब्रॉन्कायल अस्थमाची प्रकरणे वाढत असल्याचे दिसत आहे. जगभरात ३०० दशलक्ष रुग्ण आहेत. विविध वैद्यकीय जर्नल्समध्ये प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार, २००० सालच्या सुरुवातीला देशात आढळणाऱ्या दम्याचे प्रमाण ३.३ टक्के होते, ते २००९मध्ये ७.२४ टक्के इतके झाले तर २०१५ साली ते वाढून ११.६ टक्के इतके झाले होते.दमा हा एक जीवनशैलीशी निगडित आजार झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, देशात १५-२० दशलक्ष दम्याचे रुग्ण आहेत. संघटनेच्या अभ्यासानुसार, २५ टक्के लोकांना एखाद्या अॅलर्जीने ग्रासलेले आहे. त्यापैकी ५ टक्के व्यक्तींना दमा आहे. यासंदर्भात व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, २०२५ सालापर्यंत जगभरातील दम्याच्या रुग्णांमध्ये तब्बल १०० दशलक्ष व्यक्तींची भर पडणार आहे. ‘ब्रॉन्कायल अस्थमा’ हा अनुवंशिक विकार आहे. कुटुंबामध्ये दमा असेल तर पुढील पिढीमध्ये दम्याची लागण लागण्याची शक्यता ७.४ पटीने वाढते. जी मुले आठवड्यातून तीनहून अधिक वेळा फास्ट फूड खातात आणि शारीरिक हालचाल करीत नाहीत त्यांना दम्याची लागण होण्याची शक्यता अधिक असते. बाळाच्या जन्मानंतर पहिले ६ महिने स्तनपान आणि फळे व भाज्या यांचे सेवन यामुळे लहान मुलांना अस्थमा होण्याची शक्यता कमी होते. आठवड्यातून तीन वेळा फळे खाल्ली तर दमा होण्याची शक्यता १४ टक्के कमी होते, असे पल्मोनोलॉजिस्ट डॉ. अरविंद काटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.डॉ. अमिता नेने म्हणाल्या, हवेचे प्रदूषण, वाहनांमधून बाहेर पडणारा धूर, बांधकामाच्या ठिकाणी असणारी धूळ, पॅसिव्ह स्मोकिंग ही लहान मुलांना दमा होण्याची काही प्रमुख कारणे आहेत. याव्यतिरिक्त, सी सेक्शन प्रसूतीच्या माध्यमातून जन्मलेल्या बाळांना दमा होण्याची शक्यता ४ पटीने अधिक असते. घरातील भिंतींना ओल असेल तर बुरशीचे प्रमाण वाढते आणि घरी पाळीव प्राणी किंवा अळ्या असतील तर त्यामुळे दमा होण्याचे प्रमाण वाढते. बदलत्या जीवनशैलीमुळे तणाव आणि राग येणाचे प्रमाण वाढलेले आहे आणि जंक फूड खाल्ल्यामुळे चरबी आणि साखरेचे प्रमाण वाढू लागले आहे. यामुळे लहान मुलांना ब्रॉन्कायल अस्थमा होण्याचा धोका वाढतो. (प्रतिनिधी)बंद वातानुकूलित खोलीत खूप काळ घालवला तर शिंक येणे, नाक चोंदणे अशी लक्षणे जडतात. वर्गात मुले एकमेकांच्या खूप जवळ बसतात. त्यामुळे त्यांना हा संसर्ग होण्याची शक्यता असते. विशेषत: जी मुले नाजूक किंवा अॅलर्जीप्रति संवेदनशील असतात त्यांचा खालील आणि वरील श्वसनमार्ग चिघळतो. कारण शहरी भागांत राहणारी मुले बंद वातावरणात असतात आणि खोलीतील जड कण बाहेर जात नाहीत, त्यामुळे ब्रॉन्कायटिसमध्ये आणि संबंधित समस्यांमध्ये भरच पडते, असे डॉ. काटे यांनी सांगितले.
ब्रॉन्कायल अस्थमाच्या रुग्णांमध्ये वाढ
By admin | Published: May 02, 2017 3:49 AM