लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने महापालिकेने मुंबईतील खाटांची क्षमता वाढविली आहे. त्याचबरोबर आता मोठ्या खाजगी रुग्णालयांमध्येही खाटा वाढविण्याचे पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईतील मोठ्या रुग्णालयांमध्ये पाहणी करून तेथील व्यवस्थापनाशी चर्चा केली.
कोविड बाधित मात्र लक्षणं नसलेल्या रुग्णांना होम क्वारंटाइन होण्यास सांगण्यात येते.मात्र लक्षणे नसलेले काही रुग्ण मोठ्या रुग्णालयातील खाटा अडकून ठेवत असल्याने गरजू रुग्णांना खाटा मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. याची गंभीर दखल घेऊन महापौरांनी शनिवारी मोठ्या खाजगी रुग्णालयातील कोविड कक्षाला भेट देऊन खाटांची सद्यस्थिती जाणून घेतली. तसेच त्यांनी पीपीई किट घालून रुग्णांशी संवाद साधला. बॉम्बे, हिंदुजा रुग्णालयाला भेट दिल्यानंतर प्रसारमाध्यमांना माहिती दिली.
वरळीमध्ये नवीन कोविड रूग्णालय व केंद्र.....
मोठ्या खासगी रुग्णालयातील खाटांची संख्या वाढविण्यासंदर्भात रुग्णालयाच्या व्यवस्थापनासोबत चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले. न्यू मरीन लाइन्स येथील बॉम्बे रुग्णालयात कोविडसाठी ११० खाटा आरक्षित आहेत. तिथे २७० पर्यंत खाटा वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचप्रमाणे हिंदुजा रुग्णालयात ९३ खाटा असून आणखी खाटा वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच वरळीच्या नेहरू सायन्स सेंटरमध्ये १५० खाटांचे कोविड समर्पित रुग्णालय आणि पोद्दार रुग्णालयात १९३ खाटांचे सीसी -१, सीसी - २ तयार करण्यात आले असल्याचे महापौरांनी सांगितले.
खाजगी रुग्णालयांना महापालिकेने केलेल्या सूचना..
* रुग्णालयातील शौचालयांचे दिवसांतून पाच ते सातवेळा निर्जंतुकीकरण करणे.
* कोरोनाबाधित असलेले परंतु लक्षणे नसलेल्या रुग्णांनी महापालिकेच्या कोरोना काळजी केंद्र १ आणि २ मध्ये उपचार घ्यावा.
* कोविड रुग्णांनी थेट रुग्णालयात दाखल न होता पालिकेच्या विभाग कार्यालयातील वॉर रूममधूनच व्यवस्था करावी.