मुंबई : राज्य शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या वैद्यकीय प्रशिक्षण केंद्रांची क्षमता लवकरच वाढविण्यात येणार आहे. नाशिकच्या आरोग्य विद्यापीठाने याला मान्यता दिली असून यासाठी आता ६० वरून १२० मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. राज्य सरकारकडून २१ जुलै रोजी पदवीधारकांसाठी प्रवेश परीक्षा घेण्यात आली असून ५,७१६ कम्युनिटी हेल्थ आॅफिसर्सच्या जागा भरण्यात येणार आहेत.वैद्यकीय प्रशिक्षण केंद्र अधिक सक्षम होऊन या केंद्राच्या माध्यमातून रुग्णसेवेलाही बळकटी मिळावी या उद्देशाने हे पाऊल उचलले आहे. यात बीएएमएस, युनानी, बीएससी नर्सिंग पदवीधारकांची नियुक्ती करण्यात येईल. या सर्व जागा मुख्य आरोग्य अधिकारी म्हणजेच चिफ हेल्थ आॅफिसर (सीएचओ) पदाकरिता असतील.प्रवेश परीक्षेत ६,३२२ उमेदवार निवडण्यात आले असून त्यांना सहा ते आठ महिने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण सरकारी रुग्णालये, ट्रस्टची रुग्णालये तसेच खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये देण्यात येईल.सध्या प्रशिक्षण केंद्रांची क्षमता ३०० खाटा एवढी असून आता येथील प्रशिक्षणार्थींची संख्या ६० वरून १२० एवढी वाढविण्यात येण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे येथील उपलब्धता, यंत्रणा आणि साहित्यहे सर्व ६० उमेदवारांइतपत मर्यादित असून तेदेखील १२० एवढे करण्यात यावे, अशी मागणी केंद्र सरकारकडे आरोग्य विभागाकडून करण्यात आली आहे.
वैद्यकीय प्रशिक्षण केंद्रांची क्षमता वाढणार; आरोग्य विद्यापीठाची मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 5:10 AM