लहानग्यांच्या ओपीडीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:08 AM2021-08-22T04:08:58+5:302021-08-22T04:08:58+5:30
मुंबई - कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त होत असतानाच लहान मुलांच्या आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. पालिका आणि ...
मुंबई - कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त होत असतानाच लहान मुलांच्या आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. पालिका आणि खासगी रुग्णालयांसह दवाखान्यांतही मोठ्या प्रमाणात रुग्ण दिसून येत आहेत. यामध्ये व्हायरल तापाचेसुद्धा रुग्ण असल्याने काळजी घेण्याचे आवाहन बालरोगतज्ज्ञांनी केले आहे. दरवर्षी पावसाळ्यात लहान मुलांना सर्दी, खोकला, ताप ही लक्षणे दिसून येतात. मात्र, मागील वर्षी आलेल्या कोरोनाने दहशत पसरली आहे. तिसऱ्या लाटेचा धोका लहान मुलांना होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यातच डेंग्यू, मलेरिया, मेंदुज्वर आदी प्राणघातक तापाचे रुग्ण आढळून येत आहेत.
तापाची नोंद ठेवा
- डॉ. जितेंद्र गाडगे, बालरोगतज्ज्ञ
बरेचसे पालक नुसते अंग कोमट लागते, डोकं जरासे गरम लागते, असे म्हणून तापाचे औषध देतात; परंतु बाळाला खरेच ताप आहे का याची खात्री करणे गरजेचे आहे. ताप मोजून त्याची नोंद करा, ताप किती तासांनी येतो, किती वेळात उतरतो, तापाबरोबर थंडी वाजून येते का, या सर्व गोष्टींची नोंद डॉक्टरांकडे जाताना जरूर घेऊन जा. यामुळे तुमचा व डॉक्टरांचा वेळ वाचेल आणि आजाराचे निदान करणे सोपे होईल.
डेंग्यू, मलेरियाची चाचणी
लहान मुलांमध्ये सर्दी, खोकला, हगवण, साधा ताप यासह डेंग्यू, मलेरिया या जीवघेण्या आजारांची लक्षणे आढळून येत आहेत. त्यामुळे संशयित लक्षणे असताच डॅाक्टरांकडून डेंग्यू, मलेरियाची चाचणी करावयास सांगितली जात आहे.
संशयितांची चाचणी करण्याचा सल्ला
पालिका किंवा खासगी रुग्णालयात उपचारासाठी आलेली मुले संशयित आढळून आल्यास त्यांची कोरोना चाचणी करण्यात येते. शक्यतो मोठ्या माणसांपासून लहान मुलांना कोरोना होण्याची शक्यता असते, त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन बालरोग तज्ज्ञांनी केले आहे.
काय काळजी घ्यावी?
बऱ्याचदा तापामध्ये विश्रांती पुरेशी असते. जर बाळ तापात पण हसत-खेळत असेल, व्यवस्थित खात-पीत असेल, ताप उतरल्यावर उत्तमपणे खेळत असेल तर हा गंभीर आजार नाही. अशा वेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने बाळाला पॅरासिटामॉल देण्यास हरकत नाही. तापात बाळ मलूल असेल, उलटी करीत असेल, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी असेल तर ताप गंभीर आजारामुळे असू शकतो.