- शेफाली परब - पंडित
मुंबई - कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होऊ लागली आहे. ही वाढ प्रामुख्याने शहर भागात आढळून आली आहे. रुग्ण वाढीचा दैनंदिन सरासरी दर मुंबईत ०.०५ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर कुलाबा, फोर्ट, वांद्रे पश्चिम, वरळी, ग्रँट रोड, सायन, चेंबूर आणि अंधेरी या विभागांमध्ये दैनंदिन रुग्णवाढ ०.११ ते ०.६ टक्के एवढी आहे.
मुंबईत कोरोनमुक्त होण्याचे प्रमाण ९७ टक्के एवढे आहे. सर्व निर्बंध शिथिल केल्यानंतरही मुंबईतील कोरोनाचा प्रसार नियंत्रणात होता. मात्र मागील काही दिवस दोनशेच्या घरात असलेली दररोजच्या बाधित रुग्णांची संख्या आता ७५० वर पोहोचली आहे. शनिवारी एका दिवसात ७५७ नवीन रुग्ण सापडल्याने आता ३७०३ सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत.
दादर, माहीम, धारावीत रुग्णवाढ-
धारावी पॅटर्नमुळे जी उत्तर विभागाच्या हद्दीतील दादर, माहीम, धारावी परिसरात कोरोनाचा प्रसार पूर्णपणे नियंत्रणात आला होता. हा विभाग कोरोना मुक्तीच्या मार्गावर असल्याचे चित्र होते. मात्र आता या विभागातही कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढलेली दिसून येत आहे. शनिवारी धारावीत सहा, दादर आणि माहीममध्ये प्रत्येकी आठ बाधित रुग्ण आढळले आहेत. शुक्रवारी दादर येथील प्रयोगशाळेत १२ कर्मचारी बाधित आढळून आल्यानंतर येथील कोविड चाचणीचे प्रमाणही वाढवण्यात आले आहे.
या विभागांमध्ये दैनंदिन रुग्ण वाढ-
विभाग... टक्के
ए (कुलाबा, फोर्ट)... ०.११
एच पश्चिम(वांद्रे ).... ०.१०
जी दक्षिण (वरळी, प्रभादेवी)...०.०९
डी...ग्रँट रोड, मलबार हिल...०.०९
के पश्चिम (अंधेरी पश्चिम)... ०.०७
के पूर्व अंधेरी पूर्व, जोगेश्वरी...०.०६
एम पश्चिम (चेंबूर)...०.०६
एफ उत्तर, सायन माटुंगा...०.०६
सील मजले वाढले-
दोन ते पाच बाधित रुग्ण सापडल्यास तो मजला सील करण्यात येतो. मुंबईत ९६९ मजले सील आहेत. यापैकी अंधेरी पश्चिममध्ये सर्वाधिक २४९ मजले सील करण्यात आले आहेत. तर पाचहून अधिक बाधित रुग्ण सापडलेल्या १७ इमारतीमध्ये प्रवेश प्रतिबंधित करण्यात आला आहे.