मुंबई : मुंबईत एप्रिल, मे व जून या २०२१ मधील मागील तीन महिन्यांत २ आणि ३ बीएचके घरांच्या मागणीत वाढ झाली आहे. शहरातील एकूण घर खरेदीच्या सुमारे ७० टक्के घर खरेदीदार २ आणि ३ बीएचके घरांना पसंती देत आहेत. मध्यम व मोठ्या घरांचा यामध्ये समावेश आहे. जानेवारी, फेब्रुवारी व मार्च या तीन महिन्यांपेक्षा ही मागणी १० टक्क्यांनी वाढली आहे. तर २०२० च्या तुलनेत ही मागणी १८ टक्क्यांनी वाढली आहे.
मॅजिकब्रिक्सने सादर केलेल्या अहवालात ही माहिती समोर आली आहे. २०२१च्या दुसऱ्या तिमाहीत १ बीएचके घरांची मागणी घरांच्या एकूण मागणीच्या २४ टक्क्यांनी घटली आहे. तर पहिल्या तिमाहीत ती ३४ टक्क्यांनी घटली होती. मागील वर्षीदेखील ही मागणी ३७ टक्क्यांनी घटली होती. मुंबई महानगर क्षेत्रातील नवी मुंबई, ठाणे या परिसरांमध्येदेखील १ बीएचके घरांची मागणी काही प्रमाणात घटल्याचे दिसून आले आहे.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार मागील काही महिन्यांमध्ये सरकारद्वारे मुद्रांक शुल्कावर देण्यात आलेली सवलत, गृहकर्जावर मिळालेली सवलत तसेच विकासकांची आकर्षक ऑफर्स यामुळे २ आणि ३ बीएचके घरांच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली.
‘वर्क फ्रॉम होम’मुळे अनेक नागरिकांना मोठ्या घरांची जास्त गरज भासू लागली. त्यामुळे नागरिकांनी मोठी घरे घेणे पसंत केले. या काळात मुंबईतील पश्चिम उपनगरात मोठ्या प्रमाणात घर खरेदी झाली. यानंतर ठाणे व नवी मुंबईतदेखील घर खरेदीमध्ये वाढ पाहायला मिळाली. पुढील काळात मुंबई महानगर क्षेत्रात मेट्रो कनेक्टिव्हिटी वाढल्यावर घर खरेदीमध्ये अजून वाढ पाहायला मिळणार आहे.