भांडवली मूल्यावरील कराच्या सूचनांना हवी मुदतवाढ

By admin | Published: April 12, 2017 03:03 AM2017-04-12T03:03:12+5:302017-04-12T03:03:12+5:30

मालमत्तेच्या भांडवली मूल्याच्या आकारणीचा तपशील विभागाच्या सहायक करनिर्धारक व संकलकांच्या कार्यालयात १३ एप्रिलपर्यंत नागरिकांना पाहता येणार आहे़ परंतु याची

Increase in demand for taxation on taxation of capital | भांडवली मूल्यावरील कराच्या सूचनांना हवी मुदतवाढ

भांडवली मूल्यावरील कराच्या सूचनांना हवी मुदतवाढ

Next

मुंबई : मालमत्तेच्या भांडवली मूल्याच्या आकारणीचा तपशील विभागाच्या सहायक करनिर्धारक व संकलकांच्या कार्यालयात १३ एप्रिलपर्यंत नागरिकांना पाहता येणार आहे़ परंतु याची माहिती बहुतेक नागरिकांकडे पोहोचली नसल्याने ही मुदत अपुरी पडत आहे़ यामुळे ही मुदत वाढविण्याची मागणी जोर धरीत आहे़ मात्र अद्याप प्रशासनाने याची दखल घेतलेली नाही़
भांडवली मूल्यावर आधारित करप्रणालीनुसार मालमत्ता कराची आकारणी होत आहे़ सन २०१६-२०१७ या आर्थिक वर्षातील या कराचा तपशील पालिकेच्या प्रत्येक विभागातील सहायक व करनिर्धारक व संकलकांच्या कार्यालयात उपलब्ध आहे़ या आकारणीबाबत हरकतीचे अर्ज करण्यासाठी १३ एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली आहे़ त्यानंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार करण्यात येणार नाही. परंतु करनिर्धारण विभागाकडून भांडवली मूल्य ठरविताना काही त्रुटी राहण्याची शक्यता आहे़
त्यामुळे वेळीच हरकत घेत वाद सोडविला नाही, तर न्यायालयाकडे धाव घ्यावी लागते़ जनतेला होणाऱ्या या अडचणींची दखल घेत महाराष्ट्र सोसायटीज वेल्फेअर असोसिएशन या संस्थेने करनिर्धारणाच्या कामी सहकारी गृहनिर्माण संस्थांना मोफत मार्गदर्शन उपलब्ध केले आहे. तसेच हरकती व सूचना नोंदविण्यास मुदतवाढ देण्याची मागणीही (मेस्वा) या संस्थेचे अध्यक्ष रमेश प्रभू यांनी महापालिकेकडे केली आहे. (प्रतिनिधी)

- हे अर्ज मालमत्ताधारक अथवा त्यांनी रीतसर पत्र दिलेल्या व्यक्तीनेच करणे अपेक्षित आहे़ यामध्ये मुंबई महापालिका कायद्याप्रमाणे कोणत्या मुद्द्यांवर भांडवली मूल्याच्या आकारणीविरुद्ध हरकत घेण्यात येत आहे? त्याचा तपशील थोडक्यात द्यावा लागणार आहे़
या शर्तीप्रमाणे जर हरकत अर्ज नसतील, तर त्याचा विचार केला जाणार नाही. याबाबतची जाहीर सूचना महापालिकेने २३ मार्च रोजी प्रसिद्ध केली आहे़
मात्र, याबाबत नागरिकांना फारशी माहिती नाही.

Web Title: Increase in demand for taxation on taxation of capital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.