पोलीस आयुक्तांच्या अडचणीत होणार वाढ; गृहमंत्र्यांनी मागवली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 02:43 PM2020-02-13T14:43:26+5:302020-02-13T14:45:07+5:30
बर्वे चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.
मुंबई - मुंबई पोलीस आयुक्तसंजय बर्वे यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी समन्स बजावलं असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे पोलीस आयुक्तसंजय बर्वे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पदाचा गैरवापर करत पत्नी शर्मिला आणि मुलाला सुमुख यांना कंत्राट देणं महागात पडलं आहे. त्यामुळे बर्वे चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.
२०१९ मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात महाराष्ट्रात आचारसंहिता सुरु असताना पोलीस खात्यातील महत्त्वाचे रेकॉर्ड आणि रिपोर्ट्सचं डिजिटायझेशन करण्याचा निर्णय घेतला. डिजिटायझेशनचं कंत्राट हे मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांचा मुलगा सुमुख आणि पत्नी शर्मिला यांच्या नावावर नोंदणी असलेल्या कंपनीला देण्यात आले आहे.
काही मराठी वृत्तवाहिन्यांच्या दिलेल्या माहितीनुसार तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखाते देखील होते. त्यावेळी त्यांनी ७ ऑक्टोबर २०१९ रोजी मुंबई पोलिसांच्या रेकॉर्ड्सचे डिजिटायझेशन करण्याचं कंत्राट 'क्रिस्पक्यू इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीला ५ वर्षांसाठी दिलं गेलं होतं. यावर महाविकास आघाडीचे महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चौकशीसाठी आता याबाबत माहिती मागवली आहे. देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आम्ही या प्रकरणात सर्व माहिती गोळा करत असून या प्रकरणाची चौकशी केली जाईल.
Maharashtra Home Min Anil Deshmukh on reports that a firm owned by Mumbai Police Commissioner Sanjay Barve's son&wife was awarded a contract of digitisation of police's records by previous BJP govt: We're gathering all info on it. We'll also seek information on this from him pic.twitter.com/Ngg6fg2BWl
— ANI (@ANI) February 13, 2020
मुंबई आयुक्त संजय बर्वे हे येत्या २९ तारखेला सेवानिवृत्त होणार आहेत. ज्या कंपनीला या कामाचं कंत्राट देण्यात आलंय त्या 'क्रिस्पक्यू इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीत १० टक्के हिस्सा हा शर्मिला बर्वे आणि ९० टक्के हिस्सा हा सुमुख बर्वे यांचा आहे. या कंपनीकडून पुरवण्यात आलेलं सॉफ्टवेअर हे पूर्णपणे मोफत असून यामधून कंपनीला कोणत्याही प्रकारचा आर्थिक फायदा झालेला नाही असा खुलासा करत सुमुख बर्वे यांनी म्हटलं आहे.