वीजदरवाढीवरून भाजपा-काँग्रेसमध्ये जुंपली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 05:53 AM2018-12-04T05:53:38+5:302018-12-04T05:53:44+5:30

मुंबई उपनगरातील वीजग्राहकांना अदानी कंपनीकडून आकारण्यात आलेल्या वाढीव वीजदरावरून भाजपा, काँग्रेसमध्ये जुंपली आहे.

Increase in electricity tariffs in BJP-Congress | वीजदरवाढीवरून भाजपा-काँग्रेसमध्ये जुंपली

वीजदरवाढीवरून भाजपा-काँग्रेसमध्ये जुंपली

Next

मुंबई : मुंबई उपनगरातील वीजग्राहकांना अदानी कंपनीकडून आकारण्यात आलेल्या वाढीव वीजदरावरून भाजपा, काँग्रेसमध्ये जुंपली आहे. वीजबिलांबाबत ग्राहकांच्या तक्रारींची दखल घेत वीज नियामक आयोगाकडे तक्रार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून काँग्रेस केवळ श्रेयाचे राजकारण करत असल्याचा आरोप भाजपाने केला. तर वीजदरवाढीच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश नाटक असल्याचा पलटवार काँग्रेसने केला.
अदानी कंपनीकडून उपनगरातील ग्राहकांना आकारण्यात आलेले वाढीव वीजदर आणि प्रत्यक्ष मीटर रीडिंग न घेताच आकारलेल्या वीजबिलांबाबत वीज नियामक आयोगाकडे (एमईआरसी) जाण्याचा निर्णय राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि ऊर्जा विभागाचे सचिव अरविंद सिंग यांनी घेतला आहे. ग्राहकांच्या तक्रारींबाबत चौकशी करावी आणि एमईआरसीकडे जावे, या मागणीसाठी ३० नोव्हेंबरलाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती, असे मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी ऊर्जामंत्र्यांना त्याबाबत निर्देशही दिले. या भेटीची आणि पाठपुराव्याची दखल घेत सरकारने हे प्रकरण तातडीने एमईआरसीकडे पाठविण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसला उशिरा जाग आली. ते श्रेयाचे राजकारण करण्याची संधी साधत असल्याचे शेलार म्हणाले.
तर काँग्रेसच्या मुंबईतील १५ स्थानकांबाहेरील आंदोलनांमुळेच भाजपा सरकारला व देवेंद्र फडणवीस यांना जाग आली आणि त्यांनी या वीजदरवाढीच्या चौकशीचे आदेश दिले, असा दावा मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला. एमईआरसी, अदानी कंपनीच्या संगनमतानेच ही दरवाढ झाल्याचे ते म्हणाले.
>‘अदानी’कडून चौकशीचे स्वागत
अदानी वीज कंपनीने चौकशीचे स्वागत केले. दरवाढीवरून ग्राहकांमध्ये वाढत्या गैरसमजाबाबत चिंता व्यक्त करतानाच जनसुनावणी आणि पारदर्शक पद्धतीनेच विजेचे दर निश्चित केल्याचे कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले. दरवर्षी आॅक्टोबर महिन्यात विजेची मागणी वाढते. तरीही ग्राहकांच्या तक्रारींच्या निवारणासाठी उपनगरात सहा कार्यालये सुरू करण्यात आल्याचे प्रवक्त्याने स्पष्ट केले.

Web Title: Increase in electricity tariffs in BJP-Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.