- नामदेव मोरे (नवी मुंबई )
राज्यातील व देशातील दुष्काळाच्या झळा नागरिकांना बसू लागल्या आहेत. मुंबई बाजार समितीमध्ये धान्य, कडधान्य व डाळींची आवक घटू लागली आहे. पंधरा दिवसांमध्ये आवश्यकतेपेक्षा कमी माल विक्रीसाठी येऊ लागला असून गहू, ज्वारी, तांदळासह डाळींच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पंधरा दिवसांपूर्वी रोज सरासरी ४ हजार टनांपेक्षा जास्त अन्नधान्याची व जवळपास ८०० टन डाळी कडधान्याची आवक होत होती. पंजाब, हरियाणा व इतर ठिकाणावरून गहू, तांदूळ विक्रीसाठी येत आहे. गव्हाची आवक ८०० टनांवरून ७०० टन झाली असून, बाजारभाव क्ंिवटलमागे १०० रुपयांनी कमी झाले आहेत.
मुंबईमध्ये सर्वाधिक खप तांदळाचा होत असतो. सरासरी २ हजार टनांची आवक होत असते; पण सद्य:स्थितीमध्ये एक हजार ते बाराशे टनांची आवक होत आहे. तांदळाचे दरही प्रतिकिलो २८ ते ३० वरून ३० ते ४० रुपये झाले आहेत. आवक निम्म्यावर आली असल्यामुळे व्यापाऱ्यांसह बाजार समिती प्रशासनानेही चिंता व्यक्त केली आहे. तांदूळ उत्पादक राज्यांमधून नवीन पिकाची आवक किती व कधीपासून होणार त्यावर बाजारभावाची स्थिती ठरणार आहे.
ज्वारीची किंमतही प्रतिकिलो एक रुपयाने वाढली आहे. पंधरा दिवसांमध्ये डाळींच्या किमतीही वाढल्या आहेत. चणाडाळ प्रतिकिलो ३ रुपये, तूरडाळ २ रुपयांनी, मूगडाळ ३ रुपयांनी, वाटाणा १ रुपयाने वाढला आहे. धान्य मार्केटच्या अधिकाऱ्यांनी देशातील व राज्यातील दुष्काळी स्थितीमुळे मार्केटमध्ये आवक होत नसल्याचे मत व्यक्त केले आहे. मुंबईमध्ये डाळी राज्यातील विविध भागांमधून विक्रीसाठी येत असतात. राज्यात यावर्षी पीकच झाले नसल्यामुळे डाळींचे दर अजून वाढण्याची शक्यता आहे. आवक निम्म्यावर आल्यामुळे कामगारांना मजुरीही कमी मिळू लागली आहे.
दुष्काळामुळे आवक कमी होत असली तरी प्रत्यक्षात थेट पणनमुळे मुंबईत परस्पर माल जात नाही ना याची चौकशी करण्याची मागणी मार्केटमध्ये दबक्या आवाजामध्ये होऊ लागली असून, घसरलेली आवक हाच सर्वांच्या चर्चेचा विषय बनला आहे. यासाठी आवक जावकचे नियोजन करणे आवश्यक आहे. नवीन पीक किती व कधी येणार यावर डाळींचे बाजारभाव अवलंबून असणार आहेत.
दक्षिणेकडील राज्यांमधून ४०० ते ४५० टन नारळाची आवक होत आहे. पंधरा दिवसांपूर्वी सरासरी १५ रुपये किलो दराने नारळाची विक्री होत होती. एक रुपयाने दर कमी झाले आहेत. मागणीप्रमाणे पुरवठा होत असल्यामुळे दर स्थिर आहेत. गुळाची आवकही वाढत आहे.
पश्चिम महाराष्ट्रातून व इतर ठिकाणावरून ६० ते ७० टन गुळाची आवक होत आहे. साखरेचे दरही ३२ वरून ३० रुपये किलो एवढे झाले आहेत. विदेशातून सव्वाशे टन खारीक व ५० टन खजूरची रोज विक्री होत आहे. ५० टन बदामचीही विक्री होऊ लागली आहे. दिवाळीपासून सुकामेव्याचे दर पूर्णपणे स्थिर असून त्यामध्ये काहीही बदल झालेला नाही.