Join us

गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्ये वाढ

By admin | Published: November 06, 2014 1:45 AM

पावसाळा संपून एक महिना उलटला तरीही अजून मुंबईकरांची तब्येत नरम-गरम असल्याचेच दिसून येत आहे.

मुंबई : पावसाळा संपून एक महिना उलटला तरीही अजून मुंबईकरांची तब्येत नरम-गरम असल्याचेच दिसून येत आहे. मुंबईकरांना तापाच्या बरोबरीनेच गॅस्ट्रोचा त्रासही वाढल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. सप्टेंबर महिन्यात गॅस्ट्रोचे ६७१ रुग्ण आढळून आले होते. आॅक्टोबर महिन्यामध्ये या रुग्णांची संख्या आता ८०९ वर पोहोचली आहे. आॅक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये गॅस्ट्रोचे १५९ रुग्ण आढळले होते. दुसऱ्या आठवड्यामध्ये ही संख्या १८९ वर पोहोचली होती, तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यामध्ये रुग्णांची संख्या रोडावली होती. तिसऱ्या आठवड्यात १५७ तर चौथ्या आठवड्यात १४० रुग्ण आढळले होते. पाचव्या आठवड्यात रुग्णांची संख्या २४ ने वाढून १६४ वर गेली आहे. गॅस्ट्रोच्या बरोबरीनेच पाचव्या आठवड्यामध्ये तापाच्या रुग्णांची संख्या १३० ने वाढलेली आहे. आॅक्टोबरच्या चौथ्या आठवड्यामध्ये तापाचे २ हजार ५९४ रुग्ण आढळले होते, तर पाचव्या आठवड्यामध्ये २ हजार ७२४ रुग्ण आढळून आले आहेत. संपूर्ण आॅक्टोबर महिन्यातील तापाच्या रुग्णांची संख्या १३ हजार २१४ इतकी आहे. आॅक्टोबर २०१३ मध्ये तापाच्या रुग्णांची संख्या १० हजार ८४१ इतकीच होती. मलेरियाच्या रुग्ण कमी झाले आहेत. सप्टेंबर महिन्यात मलेरियाचे १ हजार ३५७ रुग्ण आढळून आले होते. तर आॅक्टोबर महिन्यामध्ये मलेरियाचे १ हजार १६४ रुग्ण आढळले आहेत. टायफॉइडचे आॅक्टोबर महिन्यात १७६, हॅपिटायटिसचे १७८, चिकनगुनियाचा १, कॉलराचे २ रुग्ण आढळून आले आहेत. स्वाइन फ्ल्यूचा एकही रुग्ण आॅक्टोबर महिन्यात आढळून आलेला नाही. (प्रतिनिधी)