मुंबई : राज्यात सर्वात कमी किमान तापमान शनिवारी अहमदनगर येथे १०.६ अंश सेल्सिअस होते. मुंबईचे किमान तापमान १५.५ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले. यंदा थंडीच्या हंगामात आतापर्यंत किमान तापमानापैकी शनिवारचे मुंबईचे किमान तापमान हे दुसरे नीचांकी किमान तापमान आहे. यापूर्वी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे १ जानेवारी रोजी मुंबईचे किमान तापमान १५.२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले होते.भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे होते. कोकण, गोव्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.नव्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच मुंबईच्या किमान तापमानात घट नोंदविण्यात येत असल्याने मुंबईकरांना चांगलीच हुडहुडी भरली असून, मुंबईकर थंडीचा सुखद अनुभव घेत आहेत. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईचे किमान तापमान १५ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले होते. त्यानंतर त्यात काही अंशी वाढ झाली आणि ते १७ अंश झाले. मात्र गारवा कायम राहिल्याने शनिवारी किमान तापमान पुन्हा खाली घसरले आणि किमान तापमानाची नोंद १५.५ अंश सेल्सिअस एवढी झाली. किमान तापमानात होत असलेल्या घसरणीमुळे सकाळी आणि सायंकाळी मुंबई शहर आणि उपनगरात गार वारे वाहत असून, मुंबईकरांना थंडी अनुभवता येत आहे.
मुंबईतील गारठ्यात वाढ; तापमान १५.५ अंशांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2020 6:22 AM