अपघात टाळण्यासाठी १४५ प्लॅटफॉर्मची उंची वाढवणार
By admin | Published: February 6, 2017 03:14 AM2017-02-06T03:14:51+5:302017-02-06T03:14:51+5:30
ट्रेनचा डबा आणि प्लॅटफॉर्ममधील पोकळीत पडून होणाऱ्या अपघातांत अनेक प्रवाशांना जीव गमवावा लागतो. त्यामुळे प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याचा निर्णय मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला
मुंबई : ट्रेनचा डबा आणि प्लॅटफॉर्ममधील पोकळीत पडून होणाऱ्या अपघातांत अनेक प्रवाशांना जीव गमवावा लागतो. त्यामुळे प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याचा निर्णय मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला. आतापर्यंत काही प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्यात आली असतानाच आणखी १४५ प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्यासाठी अर्थसंकल्पात ८ कोटी १0 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
प्लॅटफॉर्मची उंची कमी असल्याने ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या गॅपमध्ये पडून प्रवाशांना प्राण गमवावे लागतात किंवा गंभीर जखमी होतात. उच्च न्यायालयाने दिलेल्या सूचनानंतर मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याची कामे केली जात आहेत. आतापर्यंत पश्चिम रेल्वेवरील कमी उंची असलेल्या ९२ प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्यात आली आहे. तर ५२ प्लॅटफॉर्मची उंची वाढविण्याचे काम वेगाने सुरू असल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले. विरारपर्यंत ही कामे आॅगस्ट २0१७पर्यंत पूर्ण करण्यात येतील. उर्वरित विरार ते डहाणूपर्यंत कमी उंचीच्या प्लॅटफॉर्मची कामे ही दुसऱ्या टप्प्यात घेण्यात येतील.
मध्य रेल्वे मार्गावरील ५0 स्थानकांतील प्लॅटफॉर्मची कामे पूर्ण करण्यावर भर दिला जात असून, ७ ते ८ महिन्यांत ती पूर्ण केली जातील. प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्यासाठी आर्थिक निधी मंजूर करण्यात आला आहे.पश्चिम रेल्वेच्या ९७ प्लॅटफॉर्मची उंची वाढविण्यासाठी ७ कोटी १0 लाखांचा निधी मिळाला आहे. यात सध्या सुरू असलेल्या आणि दुसऱ्या टप्प्यात काम सुरू करण्यात येणाऱ्या प्लॅटफॉर्मचा समावेश असेल. मध्य रेल्वेच्या ४८ प्लॅटफॉर्मसाठीही १ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. यात ५0 स्थानकांतील काही प्लॅटफॉर्मचा समावेश आहे.
सुरक्षेसाठीही निधी मंजूर
मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील स्थानकांवर उच्च दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवली जात आहे. अशा एकीकृत सुरक्षा प्रणालीसाठीही निधी मंजूर झाला आहे.
मध्य रेल्वेवरील सहा स्टेशन्ससाठी ९ लाख तर पश्चिम रेल्वेच्या ३२ स्थानकांवरील सुरक्षेसाठी ३६ लाख रुपये मिळाले आहेत. सीसीटीव्ही, हॅण्ड हेल्ड मेटल डिटेक्टर, डोअर मेटल डिटेक्टर, बॅगेज स्कॅनर इत्यादी सुरक्षा व्यवस्था पुरवल्या जातील.