लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : २०२१ च्या एप्रिल महिन्यात २१ दिवसांमध्येच मुंबईत ६ हजार ४१३ घरांची खरेदी झाली आहे. हा आकडा २०१९ च्या एप्रिल महिन्याच्या घर खरेदीपेक्षाही अधिक आहे. २०१९ च्या एप्रिल महिन्यात ५ हजार ९४० घरांची खरेदी झाली होती. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढत असूनही यंदाच्या एप्रिल महिन्यात नागरिकांनी घर खरेदीला चांगला प्रतिसाद दिल्याचे चित्र दिसून येत आहे.
२०२० मध्ये मार्च महिन्यापासूनच लॉकडाऊन लावल्याने एप्रिल महिन्यात सर्व कामकाज बंद होते. यामुळे एप्रिल महिन्यात मुंबईत घरांची खरेदी झाली नाही. यंदाच्या एप्रिल महिन्यात घर खरेदीमध्ये वाढ झाली असली तरीही महसूल मात्र कमी मिळाला. स्टॅम्प ड्युटी व नोंदणी शुल्काच्या रकमेमुळे २०१९ मध्ये ४६० कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. तर यंदाच्या एप्रिल महिन्यात घर खरेदी जास्त होऊनही ३५७ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत शासनाच्या वतीने स्टॅम्प ड्युटी व नोंदणी शुल्कात काही प्रमाणात सूट दिली होती. अनेक व्यावसायिकांना कोरोना काळात फटका बसल्याने जास्त किमतीची घरे खरेदी करण्यात घट झाली. त्याचप्रमाणे महिलांच्या नावे घर खरेदी केल्यास स्टॅम्प ड्युटीमध्ये १ टक्का सवलत दिल्याने काही प्रमाणात महसूल कमी झाला आहे. परंतु, घर खरेदीमध्ये झालेल्या वाढीमुळे बांधकाम क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे.
.................................................