मुंबई : गेल्या दोन महिन्यांपासून संपूर्ण देशात इन्फ्लुएंझा ‘ए’चा उपप्रकार एच ३ एन २ हा विषाणू मोठ्या प्रमाणात पसरत आहे, तसेच कोरोनाची रुग्ण संख्या वाढत आहे.
या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून सर्व राज्यातील रुग्णालयांना त्यासंदर्भात उपाययोजना करण्याच्या मार्गदर्शक सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी दिल्या. सर्वच खासगी व शासकीय रुग्णालयांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व यंत्रणांचा आढावा घेण्यासाठी देशातील सर्व रुग्णालयांत १० आणि ११ एप्रिलला मॉक ड्रिल घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
फेब्रुवारीच्या मध्यापासून देशातील काही राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ दिसत आहे. त्यात केरळ आणि महाराष्ट्र अनुक्रमे पहिल्या दोन क्रमांकावर आहेत. सध्याच्या सक्रिय रुग्णांच्या आकडेवारीनुसार केरळमध्ये २६ टक्के, महाराष्ट्रात २१.७ टक्के, गुजरातमध्ये १३.९ टक्के रुग्ण आहेत.
रुग्ण वाढ होत असली तरी मृत्यू दर कमी असून, उपचारासाठी रुग्णांना रुग्णालयात दाखल होण्याची गरज भासत नाही, तसेच इन्फ्लुएंझा हा एका विशिष्ट हंगामात दिसणारा विषाणू आहे. इन्फ्लुएंझा ‘ए’चा उपप्रकार एच ३ एन २ आणि एच १ एन १ या विषाणूमुळे बाधित होणाऱ्या रुग्णांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
सोमवारी देणार स्वतंत्र सूचना
मॉक ड्रिल कशा पद्धतीने असावा यासाठीच्या स्वतंत्र सूचना सोमवारी आयोजित दृकश्राव्य बैठकीत दिल्या जाणार असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकात सांगण्यात आले आहे. पत्रावर केंद्रीय आरोग्य विभागाचे सचिव राजेश भूषण यांची स्वाक्षरी आहे.