लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी विशेष तपास पथकाने अटक केलेल्या जान्हवी मराठे आणि कंत्राटदार सागर कुंभार यांच्या पोलिस कोठडीत महानगर दंडाधिकारी न्यायालयाने २१ जूनपर्यंत वाढ केली आहे. या प्रकरणातील जान्हवी मराठे ही तिसरी आणि सागर कुंभार हा चौथा आरोपी आहे.
जान्हवी मराठे इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेडची संचालिका असताना घाटकोपर होर्डिंगबाबत सर्व कागदपत्रे तयार करून परवानगी मिळवण्यात आली होती. त्यानंतर मराच्या सांगण्यावरून होर्डिंगच्या बांधकामाचे कंत्राट सागर कुंभार याला देण्यात आले होते. या दोघांना गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने ८ जून रोजी गोव्यातून अटक केली होती. त्यांना १५ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. गेल्या ४ वर्षांत मराठे यांच्या कंपनीमार्फत घाटकोपरमध्ये उभारलेल्या एक कोटी रुपयांच्या ४ पैकी एकाही होर्डिंगचा पायाभरणीचा करार कंपनीकडे नाही.