मुंबई :मुंबई शहर आणि उपनगरात सातत्याने जाणविणाऱ्या उष्ण आणि दमट हवामानामुळे उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे. या उकाड्यापासून सुटका करण्यासाठी एसी, कुलर आणि पंखा या वीज उपकरणांचा रात्रंदिवस वापर वाढतो आहे. त्यामुळे मुंबईच्या विजेची मागणी गेल्या काही दिवसांपासून सतत ४ हजार मेगावॉट एवढी नोंदविण्यात येत असून गुरुवारीदेखील मुंबईच्या विजेची मागणी ४ हजार १०२ मेगावॉटवर नोंदवण्यात आली आहे.
मुंबईच्या विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी बेस्ट, महावितरण, अदानी आणि टाटा पॉवर यांच्याकडून विजेचा पुरवठा केला जात आहे. गुरुवारी अदानी इलेक्ट्रिसिटीकडून २ हजार १५३ मेगावॉट तर टाटा पॉवरकडून ९९५ मेगावॉट विजेचा पुरवठा करण्यात आला. तर महावितरणकडून राज्यभरात २३ हजार ५७१ मेगावॉट विजेचा पुरवठा करण्यात आला. कुठेही भारनियमन करण्यात आले नाही, अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली.
भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुढील २४ तास मुंबईच्या हवामानात फार काही बदल होणार नाही. दमट आणि उष्ण हवामान कायम राहील. गुरुवारी मुंबईचे हवामान उष्ण आणि दमट नोंदविण्यात आले. कमाल तापमानाचा पारा ३४ अंशांच्या आसपास असला तरी वाढत्या उकड्यामुळे मुंबईकरांना उन्हाळ्याचा त्रास जाणवत होता. गुरुवारी दुपारी एक ते दोन वाजेपर्यंत आकाश निरभ्र असले तरी पश्चिम उपनगरात काही ठिकाणी ढगाळ हवामानाची नोंद झाली. दिवसा इतकाच उकाडा रात्री जाणवत असल्याने मुंबईकरांना यंदाचा उन्हाळा नकोसा झाला आहे.
राज्यात काय सुरू आहे ?
राज्याचा विचार करता दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी, उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्र जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा आणि हलका ते माध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.