Join us

राज्यातील युवा महोत्सवाच्या अनुदानात वाढ

By स्नेहा मोरे | Published: December 27, 2023 7:40 PM

युवा महोत्सवामध्ये जिल्हा, विभाग व राज्य स्तरावरील युवांना रोख पारितोषिकास शासन मान्यता जाहीर केली आहे.

मुंबई - राज्यातील युवांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी केंद्र शासनामार्फत १९९४ पासून राष्ट्रीय युवा महोत्सवाचे राज्यामध्ये आयोजन करण्यात येते, यामध्ये प्रत्येक राज्याचे प्रतिनिधी संघ सहभागी होतात. मागील काही वर्षांपासून युवा महोत्सवाचे बदलेले स्वरुप, वाढलेली महागाई, मजूरी आणि युवांना युवा महोत्सवाकरीता आकर्षित करण्यासाठी राज्य शासनाने नुकतेच अनुदान मर्यादेमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

युवा महोत्सव आयोजित करण्याकरीता अनुदान वाढीच्या घेतलेल्या निर्णयानुसार आता प्रत्येक जिल्ह्याला सात लाख, विभागस्तरावर १० लाख आणि राज्य स्तरावरील महोत्सवासाठी ८५ लाख रुपयांचा निधींची तरतूद करण्यात आली आहे. राज्यस्तरावरील युवा महोत्सवात सहभागी होणाऱ्या समूह लोकनृत्यात प्रथम येणाऱ्या संघाला १५ हजार, लोकनृत्यात वैयक्तिक नृत्याला ७ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. राज्यामध्ये युवा महोत्सवाचे आयोजन प्रभावीपणे करण्यासाठी जिल्हा, विभाग व राज्य स्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन करुन राज्याचा प्रतिनिधी संघ राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी निवड करण्यासाठी येईल.

ही असेल युवा महोत्सवाची संकल्पनायुवा महोत्सवामध्ये जिल्हा, विभाग व राज्य स्तरावरील युवांना रोख पारितोषिकास शासन मान्यता जाहीर केली आहे. तसेच, यंदाच्या वर्षी २०२३-२४ च्या राष्ट्रीय युवा महोत्सवात महाराष्ट्र राज्यासाठी तृणधान्य उत्पादनात विज्ञानाचे महत्त्व तसेच सामाजिक विकासात विज्ञानाचे योगदान ही संकल्पना केंद्र शासनाने दिली आहे. या संकल्पनेवर आधारित युवा महोत्सवात जिल्हा, विभाग व राज्य स्तरावर विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. युवा महोत्सवाची व्यापकता व संकल्पना विचारात घेऊन जिल्हा, विभाग व राज्य स्तरावर समिती नेमण्यात येणार आहे.

टॅग्स :मुंबई