लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई :घाटकोपर फलक दुर्घटनेनंतर वादात अडकलेले निलंबित वरिष्ठ आयपीएस अधिकारी कैसर खालिद यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) चौकशीला सुरुवात केल्याने त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. खासगी तक्रारीवरून ही चौकशी सुरू आहे.
खालिद यांच्याविरोधात अंधेरीत राहणाऱ्या खासगी व्यक्तीने महाराष्ट्र पोलिस मुख्यालयात ७ मे २०२४ ला तक्रार केली होती. ती तक्रार पुढील चौकशीसाठी एसीबीकडे वर्ग करण्यात आली होती.
• आता एसीबीने चौकशीला सुरुवात केली आहेत. होर्डिंगच्या परवानगीमध्ये भ्रष्टाचार झाला असून, त्यात अमेरिकेतील सहलीचाही उल्लेख करण्यात आला आहे. घाटकोपरमध्ये जाहिरात फलक कोसळल्यामुळे १७ जणांचा बळी गेला. या प्रकरणात महासंचालक कार्यालयात अहवाल सादर करण्यात आला होता. त्यात अनियमिततेचा ठपका ठेवत कैंसर खालिद यांना निलंबित करण्यात आले होते.
• याप्रकरणी आता एसीबी खालिद यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करत आहे. याप्रकरणी तक्रारदारासह इतर व्यक्तींचा जबाब नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. चार पानांच्या तक्रारीत व्हॉट्स अॅप चॅटचा स्क्रीनशॉटही देण्यात आले आहेत. त्यात अमेरिकेतील सहलीबाबत झालेल्या व्यवहारांची माहिती देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी चौकशी प्राथमिक स्वरूपात असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.