मुंबई : रविवार पासून लसीचे दोन डोस घेऊन १४ दिवस पूर्ण झालेल्यांसाठी रेल्वे प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. अनेक कार्यालयांना रविवार व सोमवार सुट्टी असल्याने रेल्वे स्थानकांवर नोकरदारांचा अत्यंत कमी प्रतिसाद पाहायला मिळाला. मंगळवारी कार्यालये पुन्हा एकदा सुरु झाल्याने रेल्वे स्थानकांवर प्रवाशांच्या संख्येत काहीशी वाढ पाहायला मिळाली.
मात्र दोन डोस घेतलेल्यांना पासप्रमाणेच रेल्वेचे तिकीट देखील मिळायला हवे. तसेच स्थानकांवर इतर अनेक छुप्या मार्गांवरून प्रवाशांची घुसखोरी होत आहे ती घुसखोरी थांबविण्यात यावी. असे प्रवाशांचे म्हणणे आहे
किरण वाघ - लोकल सुरू झाल्यामुळे माझ्यासारख्या हजारो सामान्य प्रवाशांना आनंद झाला आहे. मात्र आता वाढती गर्दी लक्षात घेता रेल्वेने अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे फेऱ्यांमध्ये देखील वाढ करणे गरजेचे आहे.
गजेंद्र कोहळे - रेल्वेने दोन डोस पूर्ण झालेल्यांना केवळ पास काढण्याची मुभा दिली आहे. परंतु ज्या प्रवाशांना पासची गरज नाही, त्यांचे या निर्णयामुळे नुकसान होत आहे. केवळ एक ते दोन दिवसांच्या प्रवासासाठी दोनशे ते तीनशे रुपये खर्च करणे चुकीचे आहे. त्यामुळे सरकारने हा निर्णय बदलावा.
रीना साळुंखे - रेल्वे प्रशासनाने स्थानकांवरील सुरक्षेमध्ये अधिक वाढ करण्याची गरज आहे. कारण स्थानकालगत असणाऱ्या वस्त्यांमधून छुप्या मार्गाने अनेक जण रेल्वेस्थानकांवर प्रवेश करत आहेत. लोकलमध्ये विक्रेते, गर्दुल्ले, भिकारी यांचे प्रमाण पुन्हा वाढू लागले आहे. या गोष्टींवर कोणाचे तरी नियंत्रण असायला हवे.
पूनम घनवट - रेल्वे पास प्रमाणे दोन डोस पूर्ण झालेल्यांना तिकीट देणे देखील गरजेचे आहे. रेल्वे पासची अत्यंत गरज असलेल्या प्रवाशाला एक दिवसाच्या प्रवासासाठी शेकडो रुपये खर्च करावे लागत आहेत.
योगेश चव्हाण - डेल्टा प्लसचे रुग्ण वाढत आहेत यादृष्टीने रेल्वे प्रशासनाने तयारी करायला हवी. आजही रेल्वेच्या डब्यात अनेक जण मास्क न लावता प्रवास करत आहेत. तसेच लोकल मधून प्रवासी थुंकत देखील आहेत. यासाठी कठोर दंडाची तरतूद करायला हवी.