लोकलच्या फेऱ्या वाढवा; एसीचे तिकीट कमी करा; प्रवाशांनी मांडली कैफियत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2024 09:56 AM2024-05-02T09:56:08+5:302024-05-02T09:58:12+5:30
पश्चिम रेल्वेच्या तुलनेत मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर चालविल्या जाणाऱ्या लोकलची फ्रिक्वेन्सी (वारंवारता) कमी आहे, फेऱ्या कमी आहेत.
मुंबई : पश्चिम रेल्वेच्या तुलनेत मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर चालविल्या जाणाऱ्या लोकलची फ्रिक्वेन्सी (वारंवारता) कमी आहे, फेऱ्या कमी आहेत. त्यामुळे प्रवाशांना लोकलची वाट बघण्याशिवाय पर्याय नसतो. कल्याणच्या पुढे टिटवाळा, आसनगाव, कसारा, बदलापूर, कर्जत, खोपोली, तर हार्बर मार्गावर पनवेल अशा लांबच्या अंतरासाठी एक लोकल गेल्यानंतर दुसरी लोकल येईपर्यंत खूप वेळ लागतो. त्यामुळे लोकलची फ्रिक्वेन्सी वाढवा, एसी लोकलचे तिकीट कमी करा, अशा विविध उपाययोजना प्रवाशांनी लोकलचे वाढते अपघात टाळण्यासाठी सुचवल्या आहेत.
लोकलच्या गर्दीमुळे वाढते अपघात टाळण्यासाठी प्रवाशांनी सुचविले उपाय-
लोकल प्रवाशांना लोकलची वाट बघावी लागू नये. पश्चिम रेल्वेवर ज्या प्रमाणे लोकल धावतात, त्याप्रमाणे मध्य आणि हार्बरवर धावल्या पाहिजेत. ठाणे आणि वाशी पुढे तर लोकल प्रवाशांना खूप वेळ लोकलची वाट पाहावी लागते. फ्रिक्वेन्सी वाढविली, तर लोकलची गर्दी कमी होईल. तुलनेने प्रवास सोपा होईल.- जयदेव शिरोडकर
लोकल प्रवाशांसाठी एसी लोकल महत्त्वाच्या नाहीत, तर साध्या लोकलही महत्त्वाच्या आहेत. एसी लोकलचे तिकीट सर्वसामान्यांना परवडेल असे ठेवले, तर त्याचा फायदा होईल. गर्दी कमी करायची असेल, अपघात कमी करायचे असतील, तर लोकल फेऱ्या वाढविण्याची गरज आहे. लोकसभेच्या उमेदवारांनी या विषयावर बोलले पाहिजे, भांडले पाहिजे, हे मुद्दे मांडले पाहिजेत, मुंबईकरांच्या प्रश्नांना हात घातला पाहिजे.- वंदना सानप
महिलांसाठी विशेष लोकल चालविल्या पाहिजेत. सकाळ, सायंकाळी गर्दीच्या वेळी महिला प्रवाशांना सुरक्षित प्रवास करता आला पाहिजे. एसी लोकलचे तिकीट कमी करतानाच लोकलच्या फेऱ्या वाढविल्या पाहिजेत.- जान्हवी सावंत
लोकलमधील गर्दी कमी करण्यासाठी ऑफिसच्या वेळा बदलण्याचा पर्याय पुढे आला होता. मात्र, यावर काम झाले नाही. रेल्वे प्रवासी, रेल्वे प्रशासन, तसेच प्रवासी संघटनाही बोलत नाहीत. सगळ्यांनी एकत्र काम केले पाहिजे. लोकसभेसाठी रिंगणात असलेल्या उमेदवारांनी या विषयावर बोलले पाहिजे. एकत्र येऊन उपाय सुचविले, तर लोकलची गर्दी कमी होईल. अपघात कमी होतील.- गणेश मोरे
नोकरीनिमित्त मुंबईत स्थलांतरित होणाऱ्यांना त्यांच्या गावात, शहरात रोजगार दिला, तर येणारे लोंढे थांबतील. गर्दीवर भार पडणार नाही, शिवाय लोकल होणाऱ्या विलंबावर कायमस्वरूपी उपाय शोधले पाहिजेत.- समीर सावंत
महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले पाहिजे. सीसीटीव्ही कॅमेरे लावले पाहिजेत. महिलांसाठी विशेष लोकलची संख्या वाढविली पाहिजे. ज्या स्थानकांवर गर्दी होते, तेथे गर्दीचे व्यवस्थापन केले पाहिजे.- जयश्री पाटील