कोकणातील वैद्यकीय सुविधा वाढवा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 02:52 AM2020-07-18T02:52:48+5:302020-07-18T07:22:59+5:30

मुख्यमंत्र्यांनी आज रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्याकडून कोरोनाच्या उपाययोजनांचा आढावा घेतला. कोरोनाचा संसर्ग आता ग्रामीण भागातही दिसू लागला आहे.

Increase medical facilities in Konkan, CM directs | कोकणातील वैद्यकीय सुविधा वाढवा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

कोकणातील वैद्यकीय सुविधा वाढवा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Next

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील वैद्यकीय सुविधा वाढविण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी प्रशासनाला दिले. सुरक्षित गणेशोत्सवासाठी कोकणातील गावोगावच्या दक्षता समित्या, गणेश मंडळांनी अधिक सतर्क रहावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.
मुख्यमंत्र्यांनी आज रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्याकडून कोरोनाच्या उपाययोजनांचा आढावा घेतला. कोरोनाचा संसर्ग आता ग्रामीण भागातही दिसू लागला आहे. मुंबईजवळच्या रायगड जिल्ह्यात तो वाढतोय. त्या तुलनेत रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे अजूनही त्याचा प्रादुर्भाव नसला तरी गणेशोत्सव काळात नागरिकांची होणारी ये-जा पाहता प्रशासनाने पुरेपूर काळजी घ्यावी आणि दक्ष राहावे अशा सुचना मुख्यमंत्र्यांनी या आढावा बैठकीत दिल्या. एकूणच सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गृह विभागाच्या मार्गदर्शक तत्वांचे सर्वांनी कटाक्षाने पालन केले पाहिजे. गणेश मंडळानी आपापल्या गावांत आरोग्य शिबिरे घ्यावीत. उत्सवाचे स्वरूप खूप साधे ठेवावे, गर्दी होणार नाही तसेच मास्क लावणे, शारीरिक अंतर ठेवणे हे नियम पाळणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणजे तुमच्या भागात हा संसर्ग पसरणार नाही. प्रशासनाने या काळात चेक पोस्ट अधिक सतर्क करावेत. त्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त, आरोग्य कर्मचारी राहतील याची काळजी घ्यावी, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री म्हणाले की, रत्नागिरी, सिंधुदुर्गसाठी चाचणी प्रयोगशाळा सुरु झाली आहे. रायगडाची लवकरच कार्यान्वित होईल. त्यांच्या क्षमता वाढवता येतात का ते पाहण्याच्या तसेच या जिल्ह्यांमध्ये आयसोलेशन बेड्स तसेच इतर वैद्यकीय सुविधा तातडीने वाढवाव्यात रुग्णवाहिका पुरेशा राहतील हे पाहावे जेणे करून गणेशोत्सवापर्यंत वैद्यकीय तयारी राहील, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

रत्नागिरीत प्रत्येक गावांत ग्राम कृती दल
रत्नागिरी जिल्हाधिकारी यांनी सांगितले की, १४९६ बेड्सची सुविधा केली आहे. १०० बेड्सचे महिला रुग्णालय लवकरच सुरु होणार आहे. त्याचप्रमाणे रत्नागिरी प्रयोगशाळेत २०० चाचण्या होतात अशी माहितीही त्यांनी दिली. रत्नागिरीत प्रत्येक गावांत ग्राम कृती दल, नागरी कृती दल स्थापन केल्याचेही त्यांनी सांगितले.

सिंधुदुर्गात चेक पोस्ट सज्ज
सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांनी सांगितले की जिल्ह्यात टास्क फोर्स काम करीत असून ३२ सार्वजनिक गणेश मंडळांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. शांतता कमिटीच्या बैठका झाल्या असून सीमेलगत व इतर ठिकाणीही चेक पोस्ट तयार झाले आहेत. दीड लाख लोक जिल्ह्यात येण्याची अपेक्षा आहे अशी माहितीही दिली.

Web Title: Increase medical facilities in Konkan, CM directs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.