होम क्वारंटाइनमध्ये मुंबईकरांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:07 AM2021-09-19T04:07:43+5:302021-09-19T04:07:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग पूर्णपणे नियंत्रणात आला आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून रुग्ण संख्येत ...

Increase of Mumbaikars in Home Quarantine | होम क्वारंटाइनमध्ये मुंबईकरांची वाढ

होम क्वारंटाइनमध्ये मुंबईकरांची वाढ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग पूर्णपणे नियंत्रणात आला आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून रुग्ण संख्येत चढउतार दिसून येत आहे. त्यामुळे होम क्वारंटाइन नागरिकांची संख्याही वाढली आहे. सध्या तब्बल ६५ हजारांहून अधिक नागरिक गृह विलगीकरणात आहेत. यामध्ये बाधित मात्र लक्षण विरहित तसेच संशयित रुग्णांचाही समावेश आहे.

फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापासून मुंबईत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव वाढू लागला. बाधित रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत गेल्याने गृह विलगीकरणात असलेल्या नागरिकांची संख्या ९६ हजारांवर पोहोचली. एप्रिल महिन्यात सक्रिय रुग्णांची संख्या ९२ हजारांवर पोहोचल्याने रुग्णालयांमध्येे खाटांची कमतरता जाणवू लागली. त्यामुळे ३१ मार्चपर्यंत चार लाख ८७ नागरिक होम क्वारंटाइन होते. तर १० एप्रिल रोजी ही संख्या ६ लाख २७ हजारांवर पोहोचली.

त्यानंतर कडक निर्बंध, प्रभावी लसीकरण यामुळे कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली. त्यामुळे मागील महिन्यापर्यंत होम क्वारंटाइन रुग्णांची संख्या ४० हजारांवर आली होती. मात्र, मागील काही दिवसांपासून बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. दररोज ४०० ते ४५० बाधित रुग्ण आढळून येत आहेत. शनिवारी ४८५ बाधित रुग्ण सापडले आहेत. त्याचवेळी होम क्वारंटाइन रुग्णांची संख्याही ६५ हजार ६१८ आहे.

* सध्या ५३४ संशयित रुग्ण संस्थात्मक विलगीकरणात असून, एक लाख ५६ हजार १६४ रुग्णांनी संस्थात्मक विलगीकरणात कालावधी पूर्ण केला आहे. तर ८० लाख ७८ हजार ६६३ लोकांनी होम क्वारंटाइन कालावधी पूर्ण केला आहे.

* गेल्या २४ तासांमध्ये बाधित रुग्णांच्या संपर्कातील ४ हजार १९२ लोकांचा शोध पालिका कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. यापैकी २ हजार ९०६ संशयित अति जोखमीच्या गटातील आहेत. तर १ हजार २८६ नागरिक कमी जोखमीच्या गटातील आहेत.

Web Title: Increase of Mumbaikars in Home Quarantine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.