राज्यात काेराेनाच्या सक्रिय रुग्णसंख्येत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 04:06 AM2020-12-02T04:06:04+5:302020-12-02T04:06:04+5:30
मुंबई : राज्यात दिवाळीनंतर दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. परिणामी, मागील सात दिवसांत राज्यातील सक्रिय रुग्णांच्या संख्येतही ...
मुंबई : राज्यात दिवाळीनंतर दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. परिणामी, मागील सात दिवसांत राज्यातील सक्रिय रुग्णांच्या संख्येतही झपाट्याने वाढ झाली आहे. राज्यात २२ नोव्हेंबर रोजी ८१ हजार ५१२ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू होते. सक्रिय रुग्णांची संख्या रविवारी ९० हजार ९९७ वर पोहोचली आहे. राज्यात आठवड्याभरात ९ हजार ४८५ सक्रिय रुग्ण वाढले आहेत.
राज्यात रविवारी काेराेनाच्या ५ हजार ५४४ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ८५ मृत्यू झाले. परिणामी, बाधितांची एकूण संख्या १८ लाख २० हजार ५९ वर पोहोचली असून एकूण मृतांचा आकडा ४७ हजार ७१ इतका आहे. दिवसभरात ४ हजार ३६२ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर आतापर्यंत १६ लाख ८० हजार ९२६ रुग्ण कोरोनामुक्त झाले.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.३६ टक्के असून मृत्युदर २.५९ टक्क्यांवर आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ८ लाख ४ हजार ४२२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६.८५ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख २६ हजार ५५५ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ६ हजार ८१४ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत.
दिवसभरात नोंद झालेल्या ८५ मृत्यूंमध्ये मुंबई १८, नवी मुंबई मनपा ४, कल्याण-डोंबिवली मनपा ३, वसई-विरार मनपा १, नाशिक १, जळगाव मनपा २, पुणे ५, पुणे मनपा १९, पिंपरी-चिंचवड मनपा १, सोलापूर २, सोलापूर मनपा १, सातारा ४, सिंधुदुर्ग १, औरंगाबाद १, औरंगाबाद मनपा ३, लातूर १, उस्मानाबाद १, बीड २, नांदेड २, यवतमाळ ५, नागपूर १, नागपूर मनपा ५, भंडारा १, आणि अन्य राज्य/देशातील १ रुग्णाचा समावेश आहे.
---------------------