अंधेरी, बोरीवलीमध्ये बाधित इमारतींच्या संख्येत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 03:55 AM2020-07-26T03:55:03+5:302020-07-26T03:55:13+5:30
आठवड्याभरात धक्कादायक परिस्थिती गंभीर । एकूण सहा हजार इमारती प्रतिबंधित
मुंबई : गेल्या आठवड्याभरात अंधेरी पूर्व, जोगेश्वरी या परिसरात सील इमारतींची संख्या ७१६ वरून ७९९, तर बोरीवलीमध्ये ७२० वरून ७६६ वर पोहोचली आहे.
१८ ते २४ जुलै या कालावधीत ७७ बाधित क्षेत्र आणि ६६ सील इमारतींची प्रतिबंधातून मुक्तता झाली आहे. त्यामुळे मुंबईत आता ६३१ प्रतिबंधित क्षेत्र असून ६१६९ इमारती-इमारतींचे भाग सील करण्यात आले आहेत.
गेल्या काही दिवसांमध्ये मालाड, कांदिवली, बोरीवली, दहिसर या विभागांमध्ये सापडलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ७० टक्के रुग्ण इमारतींमधील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महापालिकेने पुन्हा एकदा दोन-तीन बाधित रुग्ण सापडल्यास संपूर्ण इमारत सील करण्याचा निर्णय दोन दिवसांपूर्वी घेतला.
कोरोनाचा प्रसार नियंत्रणात येत असल्याने मुंबईतील बाधित क्षेत्र आणि प्रतिबंधित इमारतींच्या संख्येत घट होत आहे. पश्चिम उपनगरातील इमारतींमध्ये बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. एका इमारतीत दोन-तीन रुग्ण सापडले तरी संपूर्ण इमारत सील करण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे.
कोरोना रुग्णांचा निकट संपर्क येऊन होणारी बाधा टाळण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्रात महापालिकेच्या माध्यमातून नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यात येत आहे. यामध्ये मास्क न घालता सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या लोकांकडून एक हजार रुपये दंड वसूल करण्यात येत आहे. पश्चिम उपनगरातील इमारतींमध्ये रुग्णसंख्या वाढत असल्याने फिव्हर क्लिनिक, सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांवर बैठका, कोणती खबरदारी घ्यावी? काय टाळावे? याबाबत विभाग कार्यालयामार्फत मार्गदर्शन केले जात आहे.
रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढतोय
च्मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी शनिवारी ६६ दिवसांवर पोहोचला आहे.
च्तर रुग्णवाढीची दैनंदिन सरासरी १.०६ टक्क्यांपर्यंत खाली आली आहे.
च्एच पूर्व-वांद्रे पूर्व विभागात सर्वाधिक म्हणजेच १३५ दिवसांनी रुग्णसंख्या दुप्पट होत आहे.
च्तर बी विभागात (सँडहर्स्ट रोड) १११ दिवस आणि एल विभागात (कुर्ला) १०५ दिवसांनी रुग्ण दुप्पट होत आहेत.