बेडची संख्या वाढवा, ऑक्सिजन प्लांटची उभारणी पूर्ण करा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 05:25 AM2021-06-29T05:25:35+5:302021-06-29T05:25:51+5:30

कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा मुख्य सचिवांनी घेतला आढावा

Increase the number of beds, complete the erection of the oxygen plant | बेडची संख्या वाढवा, ऑक्सिजन प्लांटची उभारणी पूर्ण करा

बेडची संख्या वाढवा, ऑक्सिजन प्लांटची उभारणी पूर्ण करा

googlenewsNext
ठळक मुद्देप्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्याचा ऑक्सिजन व्यवस्थापन आराखडा तयार करताना दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील सर्वाधिक कोरोना रुग्ण संख्येचा आधार घेऊन त्याच्या तिप्पट ऑक्सिजन उपलब्धतेबाबत नियोजन करावे

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून, राज्यात बेडची संख्या वाढविण्यावर तातडीने भर द्या. ऑक्सिजन प्लांट्स ज्या ठिकाणी कार्यान्वित व्हायचे बाकी आहेत त्या ठिकाणी त्या कामाला गती द्या, अशा सूचना राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिल्या.
कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आरोग्याच्या पायाभूत सुविधा वाढविताना लसीकरणावर भर द्यावा. प्रत्येक जिल्ह्याने ऑक्सिजन निर्मिती आणि साठवणुकीसाठी ‘जिल्हा ऑक्सिजन व्यवस्थापन आराखडा’ तयार करून त्यातील कामे जुलै पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देशही कुंटे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिवांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांची बैठक घेतली. बैठकीस आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरव विजय, आरोग्य आयुक्त डॉ. रामास्वामी, अन्न व औषध प्रशासन आयुक्त परिमल सिंग, परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे उपस्थित होते.

प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्याचा ऑक्सिजन व्यवस्थापन आराखडा तयार करताना दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील सर्वाधिक कोरोना रुग्ण संख्येचा आधार घेऊन त्याच्या तिप्पट ऑक्सिजन उपलब्धतेबाबत नियोजन करावे. ऑक्सिजनची साठवणूक आणि निर्मितीसाठी लिक्विड मेडिकल ऑक्सिजन, पीएसए प्लांट, ऑक्सिजन सिलिंडर्स याबाबींचा व्यवस्थापन आराखड्यात समावेश करण्याचे निर्देश मुख्य सचिवांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
शहरी भागात महापालिका आयुक्तांची भूमिका महत्त्वाची असून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी समन्वय ठेवावा. विभागीय आयुक्तांनी या सर्व कामावर सनियंत्रण ठेवून त्याला गती देण्यासाठी प्रयत्न करण्याचे मुख्य सचिवांनी सांगितले. यासर्व बाबींच्या समन्वयाकरिता राज्यातील सहा महसुली विभागासाठी नियुक्त नोडल अधिकारी अमित सैनी (नाशिक व कोकण), सच्चिंद्र प्रतापसिंह (पुणे आणि औरंगाबाद) आणि अश्विन मुदगल (नागपूर, अमरावती) बैठकीला उपस्थित होते.
 

Web Title: Increase the number of beds, complete the erection of the oxygen plant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.