Join us

‘गोराई खाडीमध्ये बोटींची संख्या वाढवा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 1:24 AM

बोटी किनाऱ्यालगत लावण्यासाठी अपुरी जागा

मुंबई : गोराई खाडी येथून पॅगोडा, थीम पार्क, गोराई बीचला जाण्यास शनिवार, रविवारी मोठ्या संख्येने मुंबईकर येतात. परंतु बोटींची संख्या तुरळक असल्यामुळे पर्यटकांना ताटकळत उभे राहावे लागते. त्यामुळे गोराई खाडी येथे बोटींची संख्या वाढवावी, अशी मागणी पर्यटकांनी केली आहे.

सुट्टीच्या दिवशी पर्यटकांना बोटीमधून जाण्यासाठी रांगा लावाव्या लागतात आणि तासन् तास उभे राहावे लागते. भरतीच्या वेळी गोराई खाडी येथे केवळ एकच बोट किनाºयाला लागेल एवढीच अपुरी जागा उपलब्ध आहे. त्यामुळे जागेअभावी एक बोट खाडीच्या किनाºयाला लागते. पॅगोडा व थीम पार्क येथे जाण्यासाठी ४ ते ५ बोटी आहेत. तर गोराई बीच ते गोराई गावात जाण्यासाठी दोन बोटी आहेत. साधारण एका बोटीमध्ये ५०० पर्यटकांचा समावेश केला जातो. परंतु पावसाळ्यात सुरक्षेच्या दृष्टीने पर्यटक कमी भरले जातात. युवासेना विधानसभा समन्वयक (बोरीवली) विशाल पडवळ यांनी यासंदर्भात सांगितले की, गोराई खाडीमध्ये तुरळक बोटींची संख्या आहे. सुट्टीच्या दिवशी बोटीसाठी पर्यटकांच्या रांगा लागतात. पावसाळ्यात मोठी भरती असली की बोटी बंद ठेवल्या जातात. बोटीमधून पूर्वी जास्त दुचाकी जेट्टीपर्यंत नेल्या जात असत. मात्र, सध्या १० दुचाकी बोटीमधून नेल्या जातात. सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस बीट चौकी व सागरी मार्ग चौकी आहेत. परंतु खाडीजवळ सागरी मार्ग चौकी असायला हवी होती; त्याजागी पोलीस बीट चौकी बांधण्यात आली आहे.