मुंबई : धावपट्टीवरुन घसरलेले विमान हटवण्यासाठी वापरण्यात येणा-या डिसेबल एअरक्राफ्ट रिकव्हरी किट (डीएआरके-डार्क) या उपकरणांची संख्या वाढवण्याचे निर्देश नागरी हवाई वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए)ने मुंबई, दिल्ली, बेंगळुरु विमानतळ प्रशासनाने प्रत्येकी एक व एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाला नुकतेच दिले आहेत. सध्या देशात केवळ एअर इंडियाकडे डीएआरके उपकरण उपलब्ध आहे. त्यामुळे धावपट्टीवरुन विमान घसरण्याच्या प्रसंगात विमान हटवण्यासाठी जास्त विलंब होण्याचे प्रकार घडू लागले आहेत. परिणामी असे प्रकार रोखण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.स्पाईसजेटचे विमान मुंबई विमानतळाच्या मुख्य धावपट्टीवरुन १ जुलै रोजी घसरुन गवताळ प्रदेशात रुतले होते. यामुळे मुख्य धावपट्टीचा वापर बंद झाला. हे विमान हटवण्यासाठी सुमारे ८८ तास लागल्याने या कालावधीत मुख्य धावपट्टी बंद होती. परिणामी शेकडो विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली होती, तर अनेक विमानांचे मार्ग बदलण्यात आले होते. मार्ग बदलण्यात आल्याने या कालावधीत शेकडो विमानांचा इंधनांचा खर्च वाढला होता. देशात केवळ एअर इंडियाकडे डार्क असल्याने व हे उपकरण येईपर्यंत विमान हटवण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ करण्यात आला नव्हता.डीजीसीएने याबाबत पुढाकार घेत असे प्रसंग टाळण्यासाठी मुंबई, दिल्ली, बेंगळुरु विमानतळ प्रशासनाने प्रत्येकी एक व एअरपोर्ट आॅथॉरिटी आॅफ इंडिया (एएआय) ने ३ डीएआरके खरेदी करावीत असे निर्देश नुकतेच दिले आहेत. या डीएआरके उपकरणाची किंमत सुमारे ७ कोटी रुपये असते. त्यामुळे प्रशासनाने हे उपकरण खरेदी करावे व त्यासाठी लागणारा खर्च त्याच्या वापरासाठी शुल्क आकारुन वसूल करावा असे डीजीसीएने सुचवले असून त्याला मान्यता देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.
अपघातग्रस्त विमान हटविणाऱ्या ‘डार्क’ची संख्या वाढवा, डीजीसीएचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 5:40 AM