मलेरियाच्या रुग्णसंख्येत वाढ, भीतीपोटी घरबसल्याच डॉक्टरांचा सल्ला घेण्यास पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 02:45 AM2020-08-21T02:45:07+5:302020-08-21T02:45:22+5:30
या उपक्रमाद्वारे महिन्याभरात ४० रुग्णांवर डॉक्टरांद्वारे यशस्वी उपचार करण्यात आले आहे. मात्र, अद्याप कुठल्याही मृत्यूची नोंद करण्यात आलेली नाही.
मुंबई - मुंबईत कोरोनापाठोपाठ मलेरिया ही वेगाने पसरत आहे. जुलैमध्ये मलेरियाच्या रुग्णांत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रुग्णसंख्येत दुप्पटीने वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र, कोरोनाच्या काळात रुग्णालयातील खाटांची अपुरी संख्या लक्षात घेता, मलेरिया रुग्णांचे वेळीच निदान व उपचार व्हावेत, तसेच नागरिकही भीतीपोटी रुग्णालयाला भेट देणे टाळत असल्याने येथील ग्लोबल रूग्णालयात मलेरिया रुग्णांना घरबसल्या फोनद्वारे वैद्यकीय सल्ला देण्यास सुरुवात केली आहे. या उपक्रमाद्वारे महिन्याभरात ४० रुग्णांवर डॉक्टरांद्वारे यशस्वी उपचार करण्यात आले आहे. मात्र, अद्याप कुठल्याही मृत्यूची नोंद करण्यात आलेली नाही.
पावसाळा सुरू होताच विविध आजार डोकेवर काढू लागतात. यात डेंग्यू, स्वाईन फ्लू, लेप्टो व मलेरिया यांसारख्या आजाराच्या रूग्णांमध्ये प्रकर्षाने वाढू होताना दिसून येते. परंतु, यंदाच्या वर्षी कोरोनाचं संकट पसरलेलं असताना यातून मुंबईकरांना स्वतःचा बचाव करताना आता पावसाळी आजारांना दूर ठेवणं हे आव्हान असणार आहे. कारण गेल्या महिन्याभरात मलेरियाच्या रूग्णांचा आकडा वाढताना दिसून येत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरू लागले आहे.
यासंदर्भात माहिती देताना परळ येथील ग्लोबल रुग्णालयातील इंटरनल मेडिसिन एक्सपर्ट डॉ. मंजुषा अग्रवाल यांनी सांगितले की, ६२ वर्षीय शहा हे निवृत्त अधिकारी असून अनेक दिवसांपासून ते तापाने फणफणत होते. परंतु रूग्णालयात खाट रिकामी नसल्याने त्यांच्यावर फोनद्वारे घरीच वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले आहे. तसेच आणखीन एका प्रकरणात दादर मध्ये राहणाऱ्या ४५ वर्षीय गीता यांचं हिमोग्लोबिन खूपच कमी होतं त्यात त्यांना काविळ होती. वैद्यकीय चाचणीत मलेरिया असल्याचं निदान झालं असून त्यांच्यावर रूग्णालयातच उपचार करण्यात आले आहे.
डॉ. अग्रवाल पुढे म्हणाल्या की, गेल्या १० वर्षांच्या तुलनेत मलेरियाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाली आहे आणि एका महिन्याभरात जवळपास ४० रूग्णांवर फोनद्वारे यशस्वी वैद्यकीय उपचार करण्यात आले आहे. सध्या रूग्णालयात दररोज ८-१० नव्या कोरोना रूग्णांची नोंद होत असून मलेरियाचे एक ते दोन रूग्ण आढळून येत आहेत. याशिवाय कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाला अधिक काळ ताप असल्यास त्याला मलेरिया असल्याचीही शक्यता असते.
ह्यह्यमलेरिया हा आजार एका विषाणूच्या संक्रमणाने होत असून तो एनोफिलिस जातीचा डास चावल्याने होतो. डाव चावत असताना रक्त शोषून घेतो. त्यादरम्यान मलेरियाचा विषाणू शरीरात प्रवेश करतात. साधारणतः आठ ते नऊ दिवसात ते विषाणू मोठे होतात आणि शरीरातील तांबड्या रक्त पेशींवर हल्ला चढवितात. त्यानंतर काही दिवसांनी व्यक्तीमध्ये ताप, डोकेदुखी व उलटी होणं अशी लक्षणं दिसून येतात, असेही डॉ. अग्रवाल म्हणाल्या.
मलेरिया प्रतिबंधक उपाययोजनाः-
पाण्याच्या टाक्यात डासांची उत्पत्ती होऊ नये, म्हणून त्या दुरुस्त कराव्यात. त्यास झाकण बसवावे. दैनंदिन वापराच्या पाण्याकरिता घरामधील तसेच घराबाहेरील पिंप आठवड्यातून दोनदा रिकामे करून ते स्वच्छ करावेत. त्यानंतर पाणी भरावे. डासांची पैदास होऊ नये याकरता इमारतीच्या गच्चीवर, पतऱ्यांवर किंवा घराबाहेरील परिसरात पाणी साचू देऊ नये. डास प्रतिबंधक क्रीम वापरावे. झोपताना मच्छरदानीचा वापर करणे हा चांगला पर्याय आहे.