जुहू विमानतळावरील प्रवासी संख्येत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:06 AM2021-03-28T04:06:32+5:302021-03-28T04:06:32+5:30
मुंबई : जुहू विमानतळावरील प्रवासी संख्येत गेल्या काही महिन्यांत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने शनिवारी जाहीर ...
मुंबई : जुहू विमानतळावरील प्रवासी संख्येत गेल्या काही महिन्यांत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने शनिवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी महिन्यात येथून ६ हजार ८२१, तर फेब्रुवारी महिन्यात ७ हजार ७० प्रवाशांनी प्रवास केला.
जुहू विमानतळावरून प्रामुख्याने चार्टर्ड विमाने, हॅलिकॉप्टर आणि शिकाऊ विमानांचे उड्डाण होते. कोरोनामुळे लागू केलेल्या टाळेबंदीचा फटका या विमानतळालाही बसला. प्रवासी संख्या कमी झाल्याने विमान वाहतूक रोडावली. मात्र, गेल्या काही महिन्यांत जुहू विमानतळावरील प्रवासी संख्या आणि विमान वाहतूक पूर्वपदावर येत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. जानेवारी महिन्यात या विमानतळावरून २ हजार ३०३ विमानांचे उड्डाण झाले. त्याद्वारे ६ हजार ८२१ प्रवाशांनी प्रवास केला. फेब्रुवारी महिन्यात या आकडेवारीत काहीशी वाढ झाल्याचे दिसून येते. फेब्रुवारीत २ हजार ४२४ विमानांद्वारे ७ हजार ७० प्रवाशांनी प्रवास केला.
या विमानतळावरून होणारी मालवाहतूक कोरोनापूर्व काळाच्या तुलनेत पूर्वपदावर आली नसली तरी त्यात हळूहळू वाढ होत आहे. जानेवारी महिन्यात येथून १९ मेट्रिक टन, तर फेब्रुवारीत १८ मेट्रिक टन मालाची वाहतूक झाली.
.................
कारण काय?
बाहेरील राज्यांतून मुंबईत उपचारांसाठी येणाऱ्या बऱ्याच रुग्णांनी कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी चार्टर्ड विमानांद्वारे प्रवास केला. यात गर्भवती महिला, कर्करोग पीडित किंवा अन्य आजारग्रस्तांची संख्या अधिक होती. त्यामुळे जुहू विमानतळावर दाखल होणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाल्याची शक्यता आहे, असे मॅब एव्हिएशनचे मंदार भारदे यांनी सांगितले.