CoronaVirus News: कोरोना चाचण्या वाढल्याने रुग्णसंख्येत वाढ; दररोज १४ हजार चाचण्यांचे लक्ष्य - पालिका आयुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2020 02:24 AM2020-09-08T02:24:55+5:302020-09-08T07:03:29+5:30
मुंबईत मे-जून महिन्यात सुमारे चार हजार कोरोना चाचण्या दररोज केल्या जात होत्या.
मुंबई : दररोज होणाऱ्या सरासरी ७,५०० चाचण्यांचे प्रमाण १२ हजारांपर्यंत वाढविल्यामुळेच कोरोना रुग्णसंख्येत वाढ दिसून येत आहे. प्रत्यक्षात घाबरण्याचे कारण नाही. कोरोना प्रसार रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुरू आहेत. या अंतर्गत पुढच्या टप्प्यात रोज सरासरी १४ हजार चाचण्या करण्याचे लक्ष्य असल्याचे पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सोमवारी जाहीर केले.
मुंबईत मे-जून महिन्यात सुमारे चार हजार कोरोना चाचण्या दररोज केल्या जात होत्या. हे प्रमाण कमी असल्याने ते वाढवण्याची मागणी राजकीय पक्षाकडून केली जात होती. या दरम्यान, अर्ध्या तासात निदान करणाऱ्या रॅपिड अँटीजन टेस्टचा वापर पालिका प्रशासनाने सुरू केला. तसेच जास्तीत जास्त लोकांची चाचणी व्हावी यासाठी डॉक्टरकडून प्रिस्क्रिप्शन घेण्याची अट रद्द केली. संशयित रुग्णांच्या घरून स्वॅब गोळा करण्याची सूट खासगी प्रयोगशाळांना दिली.
यामुळे चाचण्यांचे प्रमाण वाढू लागले. जुलैमध्ये दररोज ६,५०० ऑगस्टमध्ये ७,६९० पर्यंत चाचण्या वाढल्या. आधी एक लाख अँटीजन किट पालिकेने खरेदी केले होते. नंतर चाचणीचे प्रमाण वाढवण्यासाठी पुन्हा ५० हजार किट मागविले. तसेच कोरोनायोद्ध्यांची प्राधान्याने चाचणी करण्यास प्राधान्य दिले. त्यामुळे आॅगस्टअखेर चाचण्यांची संख्या रोज सरासरी दहा हजारांपर्यंत तर १ सप्टेंबर रोजी ११,८६१ पर्यंत वाढली. यापैकी ६० ते ७० टक्के रुग्ण लक्षणविरहित असल्याने चिंतेचे कारण नाही, असा दिलासा पालिकेने दिला आहे.
कोरोना नियंत्रणात आणण्यास मदत : या महिन्यात चाचण्यांची संख्या १४ हजारपर्यंत वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त रुग्ण शोधून आवश्यक उपाययोजना केल्याने कोरोना नियंत्रणात आणण्यास मदत होईल, असा विश्वास आयुक्त चहल यांनी व्यक्त केला.