मुंबई : विविध राज्यांत गुटख्यावर बंदी आणल्यानंतर महाराष्ट्राला काही फायदे झाले आहेत. राज्यातील ७४ टक्के जणांनी गुटखा सोडण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. तर, ८१ टक्के जणांना गुटखा आणि तत्सम पदार्थांच्या उत्पादन, विक्री आणि वितरणावर बंदी घातली पाहिजे, असे वाटत असल्याचे म्हटले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. राज्यासह देशातही गुटखाबंदीचा फायदा झाल्याचे दिसून आले आहे. देशातील ८३ टक्के व्यक्तींनी गुटखाबंदीनंतर गुटखा खाणे सोडल्याचे सर्वेक्षणात सांगितले. राज्यातील गुटखाबंदीनंतर त्यांच्या परिणामांचा अभ्यास केला गेला. जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी, ब्लुमबर्ग स्कूल आॅफ पब्लिक हेल्थ इन्स्टिट्यूट आॅफ ग्लोबल टोबॅको कंट्रोल आणि जागतिक आरोग्य संघटनेने मिळून हा अभ्यास केला. या सर्वेक्षणासाठी देशातील १ हजार १ गुटखा खाणाऱ्या व्यक्ती, ४५८ गुटखा विक्रेते आणि ५४ निवडक व्यापारी, सरकारी अधिकारी, एन्फोर्समेंट अधिकारी सहभागी झाले होते. राज्यातील मुंबई, ठाण्याच्या ग्रामीण आणि शहरी भागात हे सर्वेक्षण करण्यात आले. राज्यातील सर्वेक्षणात गुटखाबंदी तरुणांच्या फायद्याची असल्याचे मत ९९ टक्के व्यक्तींनी नोंदवले. ५१ टक्के लोकांच्या मते गेल्या वर्षभरात त्यांनी गुटखा सोडण्यासाठी प्रयत्न केले. तर, ५३ टक्के लोकांना गुटखाबंदीमुळे गुटखा सोडण्यासाठी मदत होईल, असे म्हटले. कर्करोग होण्याच्या शक्यतेने अनेकांनी गुटखा खाणे सोडल्याचे सर्वेक्षणात समोर आले आहे. गुटखाबंदीनंतर गुटखा खाणाऱ्यांपैकी ६४ टक्के व्यक्तींनी गुटखा तत्सम पदार्थ विकत घेऊन एकत्र करून खाण्यास सुरुवात केली. तर अजूनही पॅकिंग केलेला गुटखा खात असल्याचे ३६ टक्के लोकांनी कबूल केले आहे. गुटख्यावर बंदी आणल्यावर प्री-पॅकेज गुटखा विकण्यासाठी उत्पादकांनी दुकानदारांना संपर्क केल्याचे १३ टक्के दुकानदारांनी सांगितले. तर, १२ टक्के दुकानदार हे १८ वर्षांखालील व्यक्तींना गुटखा विक्री करीत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ३१ टक्के दुकाने शैक्षणिक संस्थांच्या १०० यार्ड परिसरातच आहेत. (प्रतिनिधी)
गुटखा सोडणाऱ्यांच्या संख्येत वाढ
By admin | Published: November 10, 2015 12:31 AM