मुंबई : सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे स्वागत करताना समुद्रकिनारी फिरणे, हॉटेलमध्ये जेवणे यासोबत मद्य प्राशन करणे हेदेखील तरुणाईमध्ये काहीसे प्रतिष्ठेचे समजले जाते. त्यामुळे एक दिवसीय मद्य प्राशनाच्या परवान्यांमध्ये डिसेंबर महिन्यात वाढ झाल्याचे समोर आले आहे. मद्य विक्रीमध्येदेखील मोठी वाढ झाल्याचा अंदाज माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवला.डिसेंबर महिन्यात मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यात २,०५५ एक दिवसीय परवाने घेण्यात आले. त्यामध्ये मुंबई शहर जिल्ह्यातील ६६७ परवाने व मुंबई उपनगर जिल्ह्यातील १,३८८ परवान्यांचा समावेश आहे. ठाणे जिल्ह्यात १८३ जणांनी हा परवाना घेतला. तर पालघर जिल्ह्यात महिन्याभरात अवघ्या ६ जणांनी परवाना घेतला. पुणे जिल्ह्यात ३२३ जणांनी एक दिवसीय मद्य प्राशनाचा परवाना घेतल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.मद्य परवान्यांमध्ये एक दिवसीय परवाना, एका वर्षासाठी परवाना व आयुष्यभरासाठी परवाना दिला जातो. एक दिवसीय मद्य प्राशन परवान्यासाठी कोणतेही कागदपत्र सादर करावे लागत नाही. मद्य प्राशन, मद्य खरेदी करणे, मद्य वाहतूक करणे, मद्य सोबत बाळगणे आदींसाठी हा परवाना दिला जातो.राज्य उत्पादन शुल्कविभागातर्फे हे परवाने दिले जातात. आयुष्यभरासाठी मद्य प्राशन परवाना घेण्यासाठी अर्जदारांना सरकारी ओळखपत्र व रहिवासी पुरावा द्यावा लागतो.
नववर्षाच्या स्वागतासाठी एक दिवसीय मद्य परवान्यांमध्ये वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2020 3:16 AM