मुंबई : सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या माध्यमातून आयोजित होणाऱ्या राज्य नाट्य महोत्सवांतर्गत घेतल्या जाणाऱ्या हौशी मराठी, मराठी व्यावसायिक, संगीत, संस्कृत, हिंदी बालनाट्य स्पर्धेतील पारितोषिकांच्या रकमेत तसेच सादरीकरणासाठी येणारा खर्च, दैनिक भत्ता आदींच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.हौशी मराठी नाट्य स्पर्धा, बालनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीच्या तसेच अंतिम फेरीच्या सर्वच पारितोषिकांच्या रकमेमध्ये दुपटीने वाढ करण्यात आली आहे. हौशी हिंदी नाट्य स्पर्धा, संस्कृत नाट्य स्पर्धा, संगीत नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या सर्वच पारितोषिकांच्या रकमेमध्ये दुपटीने वाढ करण्यात आली आहे. तर मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी प्रथम येणाऱ्या नाटकाला आता ७ लाख ५0 हजार रु., द्वितीय क्रमांकाच्या नाटकाला ४ लाख ५0 हजार रुपये, तृतीय क्रमांकाच्या नाटकाला ३ लाख रुपये अशी वाढ करण्यात आली असून या अंतिम फेरीच्या अन्य पारितोषिकांच्या रकमांमध्ये दुपटीने वाढ करण्यात आली आहे. नाट्य स्पर्धेत सहभागी होणाऱ्या कलाकारांकरिता दैनिक भत्ता, परीक्षकांकरिता दैनिक भत्ता, प्राथमिक व अंतिम फेरीसाठीच्या सादरीकरणाचा खर्च यांच्या रकमेतसुद्धा वाढ करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय जाहीर केला. (प्रतिनिधी)
‘राज्य नाट्य’च्या पारितोषिकांच्या रकमेत वाढ
By admin | Published: January 13, 2017 7:10 AM