लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या मागील लाटेच्या तुलनेत सध्या लस घेतल्यानंतर प्रोटीन अँटिबॉडी चाचण्यांमध्ये वाढ झाली आहे. लस घेतल्यानंतर शरीरात रोग प्रतिकारकशक्ती निर्माण होते, याची पडताळणी कऱण्यासाठी बऱ्याच लाभार्थ्यांकडून खासगी वैद्यकीय प्रयोगशाळांमध्ये ही चाचणी करण्यासाठी रीघ लागली असल्याचे दिसून येत आहे.
मागील काही महिन्यांपासून आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन कर्मचारी ही चाचणी करण्याला प्राधान्य देत होते. मात्र आता खासगी वैद्यकीय प्रयोगशाळांमध्ये सामान्य नागरिकांचीही गर्दी दिसते आहे. मात्र वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, लसीकरणानंतर अशा कोणत्याही चाचण्यांची आवश्यकता नसल्याचे सांगितले आहे.
खासगी प्रयोगशाळा व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार, लसीकरणाच्या प्रक्रियेत सुरुवातीला आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी या चाचण्यांना उत्तम प्रतिसाद दिला. मात्र सामान्य नागरिकांसाठी लसीकरण प्रक्रिया खुली केल्यानंतर सामान्यांचा या चाचणीला चांगला प्रतिसाद आहे. फेब्रुवारी ते एप्रिल या दरम्यान चाचण्यांचे प्रमाण तिप्पटीने वाढले आहे. दुसऱ्या डोसनंतर १५ दिवसांनी ही चाचणी करण्यात येते, त्यानंतर शरीरात रोगप्रतिकारक शक्तीची पातळी किती आहे हे समजते. याविषयी, राज्याच्या कोरोना टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले, सध्या देण्यात येणाऱ्या लसी या ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाच्या वतीने प्रमाणित करण्यात आल्या आहेत, शिवाय त्यांच्या क्लिनिकल ट्रायल्सही झाल्या आहेत. त्यामुळे लसीकऱणानंतर वैद्यकीय मार्गदर्शनानुसार, या चाचणीची आवश्यकता नाही.
गेल्यावर्षी संसर्ग पडताळणीच्या चाचणीत वाढ
गेल्या वर्षीही बऱ्याच सामान्य नागरिकांकडून आयजीजी अँटिबॉडी चाचण्या करण्याकडे अधिक कल होता. या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग होऊन गेला आहे का हे पडताळण्यात येत होते. एका खासगी वैद्यकीय प्रयोगशाळा व्यवस्थापनाच्या माहितीनुसार, गेल्या वर्षी दिवसाला २ हजार ४०० चाचण्या करण्यात येत होत्या, मात्र जानेवारी हे प्रमाण कमी होऊन हजार चाचण्यांवर आले तर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत हे प्रमाण एप्रिलमध्ये दिवसाला चार हजार इतके वाढलेले दिसून आले.