मुंबई : मंडईंची देखभाल व गाळ्यांचा खर्च महापालिकेला आर्थिक संकटात टाकत असल्याने गाळेधारकांच्या भाडेशुल्कात वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तब्बल २२ वर्षांनंतर ही भाडेवाढ करण्यात येत आहे. त्याचबरोबर पुढील आर्थिक वर्षात गाळे भाड्यावर वस्तू व सेवा करही लावण्यात येणार आहे. १७ हजार गाळेधारकांना आता दुप्पट शुल्क भरावे लागणार आहे.सध्या आकारल्या जाणाऱ्या सात ते १० रुपयांच्या तुलनेत आता मंडईतील गाळ्यांकरिता प्रति चौरस फुटासाठी १६ ते ३५ रुपये एवढे शुल्क आकारले जाणार आहे. मंड्यांमधील दररोजची स्वच्छता व देखभाल खर्चात वाढ झाली आहे. बाजार विभागाचे उत्पन्न १६.६७ कोटी असताना खर्च मात्र ७१.६४ कोटी रुपये आहे. स्थायी समितीची परवानगी मिळताच १ जुलैपासून मंडईमध्ये नवीन शुल्क लागू होणार आहे.पालिकेच्या अंतर्गत अ, ब आणि क श्रेणीमध्ये शंभर मंडया आहेत. या मंड्यांच्या गाळ्यांच्या भाड्यात १९९६ पासून वाढ झालेली नाही. त्यांची देखभाल आणि व्यवस्थापनाचा खर्च पालिकेला डोईजड झाला आहे. मंडईची वार्षिक तूट वाढल्याचा फटका मंडईंतील सुविधांना बसत आहे. मंडईंमध्ये दर्जेदार सुविधा देण्यासाठी अखेर भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.यामुळे केली भाडेवाढमंडइंर्ची देखभाल आणि सेवा सुविधांसाठी होणाºया खर्चात गेल्या काही वर्षात वाढ झाली. पालिकेला उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक करावा लागत आहे. सन २०१६-२०१७ मध्ये मंडईकरिता बाजार विभागाने ४२ कोटी १२ लाख रुपये खर्च केले. त्या तुलनेत बाजार विभागाला १७ कोटी ८० लाख रुपये उत्पन्न मिळाले. २४ कोटी ३४ लाख रुपयांची तूट आली आहे.
२२ वर्षांनंतर मंडयांच्या शुल्कात वाढ; महापालिकेचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 1:30 AM