डॉक्टर, वैद्यकीय प्राध्यापकांच्या निवृत्तीच्या वयात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:07 AM2021-01-22T04:07:14+5:302021-01-22T04:07:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : महापालिकेच्या रुग्णालयात डॉक्टर, वरिष्ठ डॉक्टर, वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक, सहाय्यक आणि सहयोगी प्राध्यापक, अधिष्ठाता यांची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महापालिकेच्या रुग्णालयात डॉक्टर, वरिष्ठ डॉक्टर, वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक, सहाय्यक आणि सहयोगी प्राध्यापक, अधिष्ठाता यांची ५० टक्के पदे रिक्त आहेत. परिणामी, कोरोना काळात अनुभवी, तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता जाणवली. त्यामुळे डॉक्टर, वरिष्ठ डॉक्टर, प्राध्यापक यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात एका वर्षाची वाढ करण्यात आली आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.
मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असताना डॉक्टरांचा तुटवडा प्रकर्षाने जाणवला. त्यामुळे महापालिका प्रशासनाने कोरोना काळात सेवानिवृत्त होत असलेल्या अनुभवी डॉक्टर, वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आदींच्या निवृत्तीचे वय ५८ वरून ५९ वर्षे करण्याचा निर्णय परस्पर घेतला. हा प्रस्ताव कार्योत्तर मंजुरीसाठी स्थायी समितीच्या ८ जानेवारीच्या बैठकीत मंजुरीसाठी प्रशासनाने आणला होता. मात्र, स्थायी समितीने हा प्रस्ताव तेव्हा राखून ठेवला होता.
या प्रस्तावाला सत्ताधारी शिवसेना, भाजप, काँग्रेस आदी पक्षाच्या गटनेत्यांनी व सदस्यांनी तीव्र विरोध दर्शविला होता. मात्र, बुधवारी हा प्रस्ताव स्थायी समितीने बिनविरोध मंजूर केला. तसेच अधिष्ठाता, प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक यांचे सेवानिवृत्तीचे वय ६२ वरून ६३ करण्याचा निर्णय पालिकेने घेतला. या संदर्भातील प्रस्ताव विनाचर्चा मंजूर करण्यात आला आहे.
* पालिका रुग्णालयात भूलतज्ज्ञांची पदे रिक्त असल्याने खासगी रुग्णालयातून भूलतज्ज्ञांना बोलवावे लागते. अनेकवेळा भूलतज्ज्ञांची वेळ मिळत नसल्याने शस्त्रक्रिया लांबणीवर पडतात. यामुळे गरजू रुग्णांना प्रतीक्षा करावी लागते.
* पालिकेच्या काही रुग्णालयांमध्ये फिजियोथेरपिस्टही नसल्याने बहुतांशी रुग्णांना खासगी रुग्णालयात जावे लागते.
* वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवल्यास तरुण डॉक्टरांवर अन्याय होईल, ते पदोन्नतीपासून वंचित राहतील, असे स्थायी समिती सदस्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणले होते.