कुलदीप घायवट मुंबई : पश्चिम रेल्वेच्या तिजोरीत आर्थिक वर्ष २०१७-१८ पेक्षा आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये जास्त उत्पन्नाची भर पडली आहे. मुंबई विभागाची आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये ३ हजार ५६ कोटी ३२ लाखांच्या उत्पन्नाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी हे उत्पन्न २ हजार ९०८ कोटी ४६ लाख होते.विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, तिकिटातून मिळणारा महसूल, पार्किंग, बुक स्टॉल, एटीएम, पे अॅण्ड यूज, कॅटरिंग, विश्रामगृह, जाहिरात यातून पश्चिम रेल्वेने २०१७ पेक्षा २०१८ मध्ये जास्त उपन्न मिळविले. पश्चिम रेल्वेने उपनगरीय रेल्वेमधून २०१७-१८ साली १३९ कोटी ९३ लाख कमाविले होते. तर २०१८-१९ मध्ये १४० कोटी ९० लाख कमाविले. मेल, एक्स्प्रेस आणि मालवाहतुकीतून २०१८-१९ साली २ हजार ९६१ कोटी ४२ लाख कमाविले. २०१७-१८ साली याच माध्यमातून २ हजार ८१६ कोटी ६ लाख रुपये उत्पन्न मिळवले होते.कॅटरिंग, पार्किंग, बुक स्टॉल, एटीएम, पे अॅण्ड यूज, विश्रामगृह, जाहिरात, पी.सी.ओ., एसटीडी यांसारख्या बाबींतून पश्चिम रेल्वेने २०१८-१९ मध्ये ९४ कोटी ९० लाख रुपये तर मागील वर्षी ९२ कोटी ४० लाख रुपये मिळविले होते.>जाहिरातीतून कमाविले ६० कोटी ३३ लाख रुपयेजाहिरातीसाठी मुंबई विभागाला ५९ कोटी ९७ लाखांचे लक्ष्य देण्यात आले होते. हे लक्ष्य मुंबई विभागाने पूर्ण करून यंदाच्या वर्षी ६० कोटी ३३ लाख रुपये कमाविले. तर मागील वर्षी ६० कोटी १७ लाख रुपये कमाविले होते. दरम्यान, पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाला ३ हजार ६९ कोटी रुपयांचे लक्ष्य देण्यात आले होते. ते त्यांना पूर्ण करता आले नाही. हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी -०.४१ टक्क्यांनी पश्चिम रेल्वेतील मुंबई विभागाची पिछेहाट झाली आहे.
पश्चिम रेल्वेच्या उत्पन्नात २०१७ पेक्षा २०१८ मध्ये झाली वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 6:18 AM