पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2019 03:48 AM2019-09-01T03:48:20+5:302019-09-01T03:48:43+5:30

७२५ शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरूम प्रकल्प । ५० कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी

Increase in scholarships for students from fifth to eighth | पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ

पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ

googlenewsNext

मुंबई : आतापर्यंत पाचवी ते आठवीच्या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना नऊ प्रकारांमध्ये २० रुपये इतकी अत्यल्प शिष्यवृत्ती मिळत होती. वार्षिक किमान २४० रुपये व दोन प्रकारांमध्ये १०० रुपये प्रतिमहिना असे या शिष्यवृत्तीचे स्वरूप होते. मात्र, आता या शिष्यवृत्तीत वाढ करण्याचा निर्णय शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी शुक्रवारी जाहीर केला, सर्व ११ प्रकारच्या शिष्यवृत्त्यांमध्ये वाढ करण्यात आली असून, शिष्यवृती रकमेव्यतिरिक्त प्रति विद्यार्थी वार्षिक रक्कम ७५० रुपये बालभारतीमार्फत देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातील पूरस्थितीमुळे मोडकळीस आलेल्या, तसेच पडलेल्या शाळांची उभारणी, दुरुस्ती करणे, तसेच इतर महत्त्वाचे शैक्षणिक प्रकल्प राबविण्यासंदर्भात शालेय शिक्षणमंत्री आणि बालभारतीच्या नियामक मंडळाची मुंबईत बैठक पार पडली. यावेळी हा निर्णय जाहीर करण्यात आला. या निर्णयामुळे शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना किमान ९९० ते कमाल १,७५० रुपये वार्षिक शिष्यवृत्ती मिळेल. राज्यातील सुमारे ३२ हजार शिष्यवृत्तीधारकांना याचा लाभ होईल. राज्यातील पूरपरिस्थिती, अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या २,१७७ शाळांसाठी, मोडकळीस आलेल्या, तसेच पडलेल्या शाळांची उभारणी, दुरुस्तीसाठी ५७ कोटींचा निधी मंडळामार्फत उपलब्ध करून देण्यास मंजुरी देण्यात आली. सोबतच महाराष्ट्रातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्रचलित अभ्यासक्रमावर आधारित विविध विषयांचे अध्ययन सोपे व्हावे, यासाठी आॅडिओ बुक बालभारतीच्या प्लॅटफॉर्मवर विनामूल्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील प्रत्येक तालुक्यातील किमान २ शाळांमधील विद्यार्थ्यांना व्हर्च्युअल क्लासरूमच्या माध्यमातून शिक्षकांचे, तसेच नामवंत लेखक, कवी, तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ, साहित्यिक, कलाकार, इतर तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेता यावे, यासाठी सुमारे ७२५ शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरूम प्रकल्प राबविण्यासाठी ५० कोटींच्या खर्चास मंजुरीही या बैठकीत देण्यात आली.

मुंबईत अद्ययावत ग्रंथालयास मंजुरी
मराठी भाषेमध्ये नावीन्यपूर्णतेची भर पडावी, त्यामध्ये मराठी भाषेचे लेखन, वाचन करणाऱ्यांना संधी मिळावी व मराठी भाषेच्या समृद्धीसाठी स्वतंत्र केंद्र असावे, यासाठी ग्रंथाली वाचक चळवळीच्या माध्यमातून मुंबईत अद्ययावत ग्रंथालय सुरू करण्यासाठी ५ कोटींचा निधी ग्रंथाली विश्वस्त संस्थेस उपलब्ध करण्यास मंजुरी दिली आहे. बालभारतीच्या माध्यमातून मराठी भाषा समृद्धीसाठी, प्रसार आणि प्रचाराच्या माध्यमातून मराठी भाषेस संपन्नता मिळवून देण्यासाठी तज्ज्ञ समिती व त्यासाठी येणाºया खर्चासही मंजुरी दिली.

Web Title: Increase in scholarships for students from fifth to eighth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.