Join us

दुकानांची वेळ वाढवा, अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार घालू; व्यापाऱ्यांचा सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 5:29 AM

Coronavirus Restrictions : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं घातले आहेत निर्बंध. अतार्किक नियमांमुळे व्यापारी मेटाकुटीला.

ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं घातले आहेत निर्बंध.अतार्किक नियमांमुळे व्यापारी मेटाकुटीला.

मुंबई : कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने खाली येत असूनही राज्य सरकारकडून व्यापारी आणि दुकानदारांवरील निर्बंध हटविले जात नाहीत. चार महिन्यांच्या लाॅकडाऊनमुळे व्यापार डबघाईला आला आहे. आठवड्यातले फक्त पाच दिवस तेही केवळ सायंकाळी चार वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी आहे. या अतार्किक नियमांमुळे व्यापारी मेटाकुटीला आले आहेत. चार दिवसांत दिलासादायक निर्णय घेतला नाही तर आगामी पालिका निवडणुकीत सत्ताधारी पक्षांवर बहिष्कार घालण्याचा इशारा फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनने दिला आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनेच निर्बंधांच्या शिथिलीकरणासाठी पाच टप्पे घोषित केले होते. मागील पाच आठवड्यांपासून घसरते आकडे लक्षात घेतले तर मुंबईचा समावेश टप्पा एक किंवा दोनमध्ये व्हायला हवा. तसे झाल्यास दुकानांसह विविध बाबी सुरू होऊन नागरिकांना दिलासा मिळाला असता. मात्र, कडक लाॅकडाऊनच्या साडेतीन महिन्यानंतर सुद्धा राज्य सरकार कोणत्याही प्रकारची सवलत द्यायला तयार नाही, असा आरोप असोसिएशनचे विरेन शहा यांनी केला आहे.

दुकानदार आणि व्यापाऱ्यांच्या समस्यांसाठी संघटनेने ज्येष्ठ नेते शरद पवारांसह सर्वच राजकीय पक्षांची भेट घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे भेटीसाठी वारंवार वेळ मागितली जात आहे, निवेदने पाठवत आहोत. अनेक नेत्यांनी व्यापाऱ्यांच्या मागणीला पाठिंबाही दिला. मात्र सरकार आपली भूमिका बदलायला तयार नाही. राज्यातील व्यापारी, दुकानदारांना अशी सापत्न वागणूक का दिली जात आहे? असा प्रश्नही विरेन शहा यांनी केला आहे.

‘मुंबईत वेळा वाढवाव्यात अन्यथा निदर्शने’ कोरोनाबाधितांची दैनंदिन संख्या शंभर किंवा दोनशेपर्यंत खाली येत नाही तोपर्यंत निर्बंध कायम ठेवण्याची भूमिका सत्ताधाऱ्यांकडून मांडली जात आहे. हा दुराग्रह बाजूला ठेवून तातडीने मुंबई महानगर क्षेत्रात दुकाने उघडण्याच्या वेळा वाढवाव्यात अन्यथा मोठ्या प्रमाणावर निदर्शने केली जातील. तसेच आगामी महापालिका निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचा बहिष्कार करण्याचा इशारा फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनने दिला आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याखरेदीमुंबईमहाराष्ट्र