लोकलमध्ये स्मार्ट फोन चोरीच्या घटनांत वाढ

By admin | Published: September 25, 2016 04:19 AM2016-09-25T04:19:46+5:302016-09-25T04:19:46+5:30

दिवसागणिक हजारो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. मात्र प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कसल्याही ठोस उपाययोजना राबविल्या जात नसल्याने लोकलमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे.

Increase in smart phone theft cases in locales | लोकलमध्ये स्मार्ट फोन चोरीच्या घटनांत वाढ

लोकलमध्ये स्मार्ट फोन चोरीच्या घटनांत वाढ

Next

- प्राची सोनवणे, नवी मुंबई

दिवसागणिक हजारो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. मात्र प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कसल्याही ठोस उपाययोजना राबविल्या जात नसल्याने लोकलमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. विशेषत: स्मार्ट फोन चोरीच्या घटनांत लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या ४ वर्षांमध्ये स्मार्ट फोन चोरीच्या तब्बल ३६१ घटना घडल्या आहेत. त्यापैकी १६४ प्रकरणांचा छडा लावण्यात रेल्वे पोलिसांना यश आले आहे.
रात्रीच्या वेळी प्रवास करणा-या प्रवाशांत या चोरट्यांची दहशत निर्माण झाली आहे. विशेषत: महिला प्रवाशांनी त्यांची चांगलीच धास्ती घेतली आहे. ट्रान्स हार्बर व वाशी-पनवेल मार्गावर चोरट्यांनी हैदोस घातला आहे. चोरटे बेमालुमपणे हातचलाखीने बॅगेतील अथवा पिशवीतील मोबाईल पळवितात. अनेकदा खिशातून किंवा पर्समधून मोबाईल पळविला जातो. हाती आलेल्या आकडेवारीनुसार मागील चार वर्षात मोबाईल चोरीच्या घटनांत वाढच होताना दिसत आहे. २०१३ मध्ये लोकलमधून ९० २०१४ मध्ये ८३ मोबाईल , २०१५मध्ये ११८ तर चालू वर्षात म्हणजेच २०१६ आॅगस्टपर्यंत ७० मोबाईल्स चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. यापैकी आतापर्यंत केवळ १६१ मोबाईल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. ताब्यात घेतलेल्या चोरट्यांपैकी बरेचसे रेल्वे रुळालगतच्या झोपडपट्टी परिसरात राहणारे असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.

सकाळी आणि संध्याकाळी लोकलमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडते. याच संधीचा फायदा घेत गर्दीत घुसून मोबाईल लंपास करण्याचा मार्ग अवलंबिला जातो. आठवड्यातून एखादी तरी मोबाईल चोरीची घटना घडते. मोबाईल फोनचा आयएमईआय नंबर पोलिसांना उपलब्ध करून दिल्यास लवकरात लवकर चोरापर्यंत पोहोचणे शक्य होत असल्याची माहिती रेल्वे पोलीसांनी दिली.

व्यसनासाठी चोरी
गांजा सारख्या व्यसनाची सवय जडल्याने त्यासाठी लागणारे पैसे मिळविण्यासाठी मोबाईल चोरी केली जाते. अशा चोरट्यांचा बंदोबस्त करण्याच्या दृष्टीने सर्वोत्परी उपाययोजना सुरू आहेत. असे असले तरी प्रवाशांनी आपल्या प्रवासा दरम्यान, सावधनता बाळगण्याचे आवाहन वाशी रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक प्रमोद ढावरे यांनी केले आहे.

महिला सुरक्षा हवी
हार्बर मार्गावरी बेलापूर ते वाशी दरम्यान चोरीच्या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे. रात्रीच्या वेळी प्रवास करणा-या महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ठोस उपाययोजना राबविण्याची मागणी नवी मुंबई रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. रात्री दहा वाजेनंतर महिला डब्यांमध्ये होणारी गर्दुले,भिकारी, मद्यपींची घुसखोरी थांबविली पाहिजे. तसेच महिला डब्यात पोलीस सुरक्षा आणखीन बळकट करण्यात यावी अशी प्रतिक्रीया संघटनेचे अध्यक्ष अभिजित धूरत यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Increase in smart phone theft cases in locales

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.