Join us  

जलद फेऱ्यांच्या थांब्यात होणार वाढ

By admin | Published: January 04, 2017 4:44 AM

मध्य रेल्वेकडून २४ जलद लोकल फेऱ्यांना दिवा स्थानकात थांबा देण्यात आला. मात्र या फेऱ्यांना थांबा देण्यात आल्यानंतरही गर्दीचा सामना करावा लागत असल्याने

मुंबई : मध्य रेल्वेकडून २४ जलद लोकल फेऱ्यांना दिवा स्थानकात थांबा देण्यात आला. मात्र या फेऱ्यांना थांबा देण्यात आल्यानंतरही गर्दीचा सामना करावा लागत असल्याने आणखी काही जलद फेऱ्यांना दिवा स्थानकात थांबा देण्याचे नियोजन मध्य रेल्वेकडून केले जात आहे. सध्याच्या फेऱ्यांत नवीन फेऱ्यांची भर पडून त्या ३0 ते ३५ फेऱ्यांपर्यंत नेण्यावर विचार असल्याचे मध्य रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. दिवा स्थानकात जलद लोकल फेऱ्यांना थांबा देण्याची मागणी केली जात होती. त्यानुसार एमआरव्हीसीकडून (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) दिवा स्थानकात बारा डबा लोकलसाठी प्लॅटफॉर्म बनवण्यात आला. १८ डिसेंबरपासून जवळपास २४ जलद फेऱ्यांना थांबाही देण्यास सुरुवात झाली. कर्जत, खोपोली, बदलापूर, कसारा, अंबरनाथ, टिटवाळा येथून सुटणाऱ्या आणि जाणाऱ्या गाड्यांना थांबा देण्यात आला. मात्र यात कल्याण, डोंबिवली यासारख्या जलद लोकल फेऱ्या नसल्याने गर्दीचा सामना दिवावासीयांना करावा लागला. त्यामुळे यावरही तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी होऊ लागली. अखेर मध्य रेल्वेकडून आणखी काही फेऱ्या वाढवण्यासाठी नियोजन करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. लवकरच नवीन फेऱ्यांचीही भर पडेल आणि प्रवाशांना दिलासा दिला जाईल. (प्रतिनिधी)