जान्हवी मोर्ये, ठाणेयंगस्टारमध्ये शरीराच्या विविध भागांवर टॅटू काढण्याचे फॅड आहे. नवरात्रीनिमित्त टॅटू काढण्याच्या प्रमाणात ३० टक्के वाढ झाली आहे. प्रमाण वाढले असले तरी तरुणांपेक्षा तरुणी जास्त प्रमाणात ते काढीत असल्याचा ट्रेण्ड दिसून येत आहे. नवरात्रीत गरबा खेळताना आपल्या फे्रण्ड्सचे अटेन्शन कॅच करण्यासाठी किंवा त्याला/तिला लट्टू करण्यासाठी या टॅटूला भलतीच डिमांड आहे.भारतीय संस्कृतीतील हिंदू धर्मात गोंदवून घेण्याची परंपरा फार जुनी आहे. मध्यंतरीच्या काळात ग्रामीण व गावंढळ लोक गोंदवून घेत असल्याची धारणा उच्चशिक्षित मध्यमवर्गीय शहरी भागात होती. त्याच्या नेमकी उलट स्थिती आजच्या फॅशनेबल जमान्यात पाहावयास मिळते आहे. विशेषत: पूर्वेकडील देशांतून टॅटू सगळ्या देशांत लोकप्रिय होत आहे. पाश्चिमात्य देशांत टॅटूचे फॅड फोफावले आहे. पूर्वेकडून पश्चिमेकडे गेलेले हे फॅड आता भारतातही मूळ धरू लागले असून तरुणाईत ते अत्यंत लोकप्रियतेच्या हिट पॉइंटवर आहे. भारतातील तरुणाईला टॅटूने वेड लावले आहे. टॅटू काढण्याचे काम करणारे डोंबिवलीतील महेश अमीन व स्वानंद भगत यांनी सांगितले की, महिनाभरात जवळपास ७५ लोक आमच्याकडून टॅटू काढण्यास येतात. सोमवार ते शुक्रवार या दिवसांत गर्दी कमी असते. शनिवार व रविवार हे ‘वीकली आॅफ’ असल्याने शहरातील तरुणाई या दोन दिवसांत टॅटू काढण्यासाठी जास्त प्रमाणात येते. एक टॅटू काढण्यासाठी २० मिनिटांपासून ८ तासांपर्यंत वेळ लागतो. टॅटूतील आर्ट वर्क किती बारीक आहे, त्यावर त्याची कलाकुसर अवलंबून असते. तसेच त्याला किती अवधी लागणार, हे त्यावर ठरते. एक टॅटू काढण्यासाठी १ हजारांपासून ५० हजार रुपयांपर्यत खर्च येऊ शकतो. त्याचे कारण टॅटूचे काम इंचावर असून त्यामुळे त्याच्या डिझाइन वर्कनुसार त्याचा खर्च वसूल केला जातो. हात, पाय, मान आणि पाठीवर टॅटू काढला जातो. त्यात तीन प्रकारे काम होते.टॅटू मशीनच्या साहाय्याने काढला जातो. हे कामसुद्धा हायजेनिक असते. एकाची सुई पुन्हा दुसऱ्याला वापरता येत नाही. प्रत्येकाला वेगळी सुई वापरावी लागते. कारण, टॅटूचे काम त्वचेशी निगडित असल्याने एखाद्याला काही आजार असल्यास त्याचा आजार दुसऱ्याला होता कामा नये, यासाठी ही काळजी घेतली जाते.टॅटू हा टेम्पररी व परमनंट स्वरूपात काढला जातो. अत्यंत काळजीपूर्वक हे काम करावे लागते. ग्राहकांची काळजी घेऊन त्यांच्या फॅशनची हौस भागविण्याकडे विशेष लक्ष दिले जाते. टॅटू हा आयुष्याशी निगडित असतो. तो काढताना डिझाइन चुकले तर ते लेझरच्या साहाय्याने त्यावर पुढील काम करावे लागते. त्यासाठी १५०० रुपयांच्या डिझाइनला साधारणपणे २५०० रुपये आकारले जातात. त्याला आमच्या भाषेत टॅटू कव्हरअप असे म्हटले जाते. स्वानंद यांनी सांगितले, ते या कामातील माहीर लोक असूनही मुंबईत मिळणारा दाम डोंबिवलीत मिळत नाही. कारण, हीदेखील एक बारीक कलाकुसर आहे. मानवाची त्वचा हाच आमच्या कलेचा कॅन्व्हास बोर्ड आहे.
नवरात्रीसाठी टॅटू काढण्याच्या प्रमाणात ३० टक्के वाढ
By admin | Published: September 23, 2014 11:42 PM