मर्यादा वाढवा, पण मराठ्यांना आरक्षण द्या!, मराठा महासंघाचा लाक्षणिक उपोषणाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 02:01 PM2023-03-24T14:01:01+5:302023-03-24T14:02:31+5:30
मुंबई मराठी पत्रकार संघात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
मुंबई : मराठा समाज १० एकर शेतीवरून १० गुंठ्यांवर आला आहे. अनेकांना मोलमजुरी करून दिवस काढावे लागत आहेत. हवी तर आरक्षणाची ५० टक्क्यांच्या वर मर्यादा वाढवा, पण मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी भूमिका अखिल भारतीय मराठा महासंघाने घेतल्याचे महासंघाचे अध्यक्ष दिलीप जगताप यांनी गुरुवारी स्पष्ट केले. हा विषय केंद्राचा असल्याने दिल्लीत जंतरमंतर येथे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करणार असल्याचा इशाराही जगताप यांनी यावेळी दिला.
मुंबई मराठी पत्रकार संघात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महाराष्ट्रात ५८ क्रांती मोर्चे निघाले व या मोर्चात ५० लाखांपर्यंत मोर्चेकऱ्यांची संख्या होती. पण त्यातून काहीच साध्य झाले नाही. त्यानंतर मराठा समाजातील बहुसंख्य संघटना व संस्थांनी ५० टक्क्यांच्या आतील व टिकणारे आरक्षण द्यावे, अशी मागणी लावून धरली. मराठा महासंघाचीही ५० टक्क्यांच्या आतील आरक्षण मिळावे हीच मागणी होती. पण ५० टक्क्यांमधून आरक्षण द्यायला सरकार तयार नसल्याचे दिसते. ही मागणी महासंघाने सोडलेली नाही. ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळण्यास विलंब लागणार असेल किंवा ते शक्य नसेल तर धोरणात बदल करून आरक्षणापासून वंचित असलेल्या मराठा समाजासह देशातील सर्व वंचित समाज घटकांना नोकरी, शिक्षण यात आरक्षण द्यावे, अशी मागणीही महासंघातर्फे करण्यात आली आहे.
महासंघ खासदारांना देणार निवेदन
राज्य सरकारच्या वतीने मराठा समाजाला २०१४ मध्ये १६ टक्के व त्यानंतर २०१९ मध्ये १२ ते १३ टक्के आरक्षण देण्यात आले होते. दोन्ही वेळा ५० टक्क्यांच्या वर आरक्षणाची मर्यादा वाढवून दिल्याने दिलेले आरक्षण टिकले नाही. शेवटच्या एकमेव पर्यायासाठी देशातील सर्व पक्षांचे अध्यक्ष आणि खासदार यांना मराठा महासंघातर्फे निवेदन देण्यात येणार असून दिल्लीमध्ये जंतरमंतर येथे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करून केंद्र सरकारचे लक्ष वेधले जाणार असल्याचे जगताप यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला महासंघाचे सरचिटणीस संभाजीराजे दहातोंडे, उपाध्यक्ष संतोष नानवटे, कोषाध्यक्ष श्रीरंग बरगे, रणजित जगताप, वैशाली जोंधळे, सुवर्णा पवार, नम्रता भोसले उपस्थित होते.