गुरूदक्षिणा म्हणून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची संख्या वाढवा, छगन भुजबळांचे पदाधिकाऱ्यांना आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 07:18 PM2022-07-13T19:18:08+5:302022-07-13T19:20:14+5:30
Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत आज मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक यशवंतराव चव्हाण सेंटर येथे घेण्यात आली. यावेळी छगन भुजबळ बोलत होते.
मुंबई : आज गुरुपौर्णिमा आहे, या दिवशी सर्वांनी एकच निर्धार करा आणि पवार साहेबांना गुरूदक्षिणा म्हणून मुंबई शहरात आपल्या नगरसेवकांची संख्या वाढवून दाखवा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पदाधिकाऱ्यांना केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत आज मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक यशवंतराव चव्हाण सेंटर येथे घेण्यात आली. यावेळी छगन भुजबळ बोलत होते.
मुंबई शहरात पाणी, मीटर, सांडपाण्याचा निचरा असे अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांकडे आपल्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष देऊन ते सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला पाहिजे, अशी सूचना छगन भुजबळ यांनी केली. आज गुरुपौर्णिमा आहे. या दिवशी सर्वांनी एकच निर्धार करा आणि शरद पवार यांना गुरूदक्षिणा म्हणून मुंबई शहरात आपल्या नगरसेवकांची संख्या वाढवून दाखवा, असे आवाहन छगन भुजबळ यांनी पदाधिकाऱ्यांना केले.
याचबरोबर, शरद पवार यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हटले की, शेवटच्या कार्यकर्त्याला शक्ती देऊन त्याची प्रतिष्ठा कशी राखली जाईल, हा प्रयत्न करण्यासाठी काल राज्यव्यापी आणि आज मुंबई विभागीय कार्यकारिणीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली. अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपापली मते दोन्ही दिवसाच्या बैठकीत मांडली आहेत. यापुढे आपल्याला एकच काम करायचे आहे ते म्हणजे संघटना वाढवून ती बळकट करायची आहे. तसेच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत सक्रीय सहभाग नोंदवण्याची ग्वाही शरद पवार यांनी यावेळी दिली.
जयंत पाटील यांनी बैठकीला संबोधित करताना सांगितले की, मुंबईत आपला पक्ष वाढविण्यासाठी अनेक वर्षांपासून आपण प्रयत्न करतोय. पक्षनिष्ठा ठेवून काम करणारे बोरिवलीपासून कुलाब्यापर्यंत प्रयत्न करत आहेत. राजकारणाच्या दृष्टीने महाराष्ट्रात मुंबई शहर हे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपण शहरात स्वतंत्र फादर बॉडी तयार केली आहे. आपण अधिक सतर्कपणे प्रत्येक वॉर्डमध्ये पक्षाचा उमेदवार देणे गरजेचे आहे. यासाठी आपल्याला सातत्याने लोकांमध्ये जाऊन संवाद साधला पाहिजे. यासाठी सर्वांनी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करावा. याद्वारे पक्षाची भूमिका प्रकर्षाने मांडण्यास मदत होईल.
या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, मुंबई विभागीय कार्याध्यक्ष राखी जाधव, अजित पवार, एकनाथ खडसे, कोषाध्यक्ष हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, महिला प्रदेशाध्यक्ष विद्याताई चव्हाण, माजी खासदार माजीद मेमन, राष्ट्रीय सचिव नरेंद्र वर्मा, मुंबई विभागीय कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, मुंबई विभागीय महिलाध्यक्ष सुरेखा पेडणेकर, मुंबई विभागीय युवक अध्यक्ष निलेश भोसले, सुनील शिंदे, सोहेल सुभेदार, विजय वाडकर, रमेश परब, धनंजय पिसाळ, अजित रावराणे आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.