मनोरंजन कार्यक्रमांतून वाढविणार मत टक्का; निवडणूक आयोगाचा जनजागृतीसाठी सोशल मीडियावर अधिक भर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 09:48 AM2024-05-06T09:48:19+5:302024-05-06T09:50:12+5:30
यंदा लोकसभा निवडणुका ऐन मे महिन्याच्या मध्यावर असल्याने मुंबईसह परिमंडळातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक आयोग कंबर कसत आहे.
मुंबई : राज्यात शहरी भागांमध्ये मतदान कमी होते. यंदा लोकसभा निवडणुका ऐन मे महिन्याच्या मध्यावर असल्याने मुंबईसह परिमंडळातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक आयोग कंबर कसत आहे. या पार्श्वभूमीवर विविध माध्यमांतून मतदारांचे प्रबोधन करत मतदान देण्यास प्रेरित करण्यात येत आहे.
इन्स्टाग्रामवरील रिल्स स्टार हेदेखील यंदा मतदारांना मतदानासाठी आवाहन करत आहेत. तसेच आयोगाकडून सोशल मीडियाचाही वापर करण्यात येत आहे.
‘बाहेरगावी जाऊ नका, मतदान करा’ -
१) मुंबई, ठाण्यात उच्चभ्रू वस्तीतील लोक मतदानाला बाहेर पडण्यास फारसे उत्सुक नसतात. त्यातच मे महिन्यात मतदान असल्याने मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील मतदार गावाकडे कूच करतात. मुंबईत ५० टक्क्यांपेक्षा कमीच मतदान होते.
२) मुंबईतील काही विधानसभा मतदारसंघांमध्ये लोकसभा निवडणुकीत ३० ते ३५ टक्के मतदान झाल्याची मागील निवडणुकीतील उदाहरणे आहेत. त्यामुळे यंदा सोशल मीडियासह इन्फ्ल्युएन्सर, सेलिब्रिटी, महत्त्वाच्या व्यक्ती, उद्योजक अशा सर्व घटकांना सहभागी करून घेत मतदारांना मतदानाचे आवाहन करण्यात येत आहे.
प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. मात्र, काही भागांत मतदानाविषयी अनास्था दिसून येते. शिवाय निवडणुका सुट्यांच्या काळात असल्याने आयोगाकडून अधिक ताकदीने सोशल मीडियासह विविध माध्यमांतून जनजागृती केली जात आहे. सेलिब्रिटींना, महत्त्वाच्या क्षेत्रातील व्यक्तींना पत्र पाठवून मतदानाविषयी संदेश देण्यास पत्र पाठविले आहे.- राजेंद्र क्षीरसागर, निवडणूक अधिकारी
वर्ष टक्केवारी
२०१९ ५५.११
२०१४ ५१.५९
२००९ ४१.४१
२००४ ४७.१५
१९९९ ४४.८६
१) महानगरांमध्ये होणारे कमी मतदान ही निवडणूक आयोगासाठी चिंतेची बाब असते. मुंबई, ठाण्यात आधीच मतदारांमध्ये निरुत्साह असतो.
२) झोपडपट्टी भागांमध्ये मतदानासाठी रांगा लागतात; पण उच्चभ्रू, मध्यमवर्गीय राहत असलेल्या परिसरातील मतदान केंद्रे दुपारनंतर ओस पडतात. मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.