महिलांच्या ‘लोकल’ छळवणुकीत वाढ
By Admin | Published: August 10, 2016 03:44 AM2016-08-10T03:44:10+5:302016-08-10T03:44:10+5:30
मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांचा प्रवास सध्या ‘असुरक्षित’ होत चालला आहे. प्रवासात महिला प्रवाशांची अनेक प्रकारे ‘छळवणूक’ होते
मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांचा प्रवास सध्या ‘असुरक्षित’ होत चालला आहे. प्रवासात महिला प्रवाशांची अनेक प्रकारे ‘छळवणूक’ होते. जवळपास २४ टक्के महिला प्रवाशांनी छळवणूक होत असल्याच्या घटनांना दुजोरा दिल्याचे सर्वेक्षणातून उघड झाले आहे. एमआरव्हीसी (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) व टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्स (टिस) यांच्या संयुक्त विद्यमाने महिला प्रवाशांच्या सोयीसुविधांबाबत सर्वेक्षणातून ही माहिती उघड झाली. रेल्वे प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज असल्याचे मत महिला प्रवाशांकडून या वेळी व्यक्त करण्यात आले आहे.
प्रवासात छळवणूक होणाऱ्या महिलांनी स्थानकात प्रवेश करताना, पादचारी पुलावरून चालताना काही टवाळखोरांकडून गर्दीचा फायदा घेत स्पर्श केला जात असल्याचे म्हटले आहे. यातही पुलांवर होणाऱ्या गर्दीचा फायदा टवाळखोरांकडून अधिक घेतला जातो. रात्रीच्या प्रवासात महिला डब्यात टवाळखोरांकडून प्रवेशही केला जातो आणि ही गंभीर बाब असून, त्याची दखल रेल्वेने गांभीर्याने घेणे गरजेचे असल्याचे सर्वेक्षणातून पुढे आले आहे. प्रवासात सर्वाधिक मनस्ताप हा महाविद्यालयीन तरुणींना होतो. प्लॅटफॉर्मवर उभे असताना लोकलमधून प्रवास करणाऱ्या काही टवाळखोरांकडून अश्लील शेरेबाजी, छेडछाडीला सामोरे जावे लागते. अशा घटना हार्बर आणि मध्य रेल्वे मेन लाइनवर अधिक होत असल्याचे सर्वेक्षणातून उघड झाले आहे. पश्चिम रेल्वेवर ३६, मध्य रेल्वे मेन लाइनवर ५१ आणि हार्बरवर २२ स्थानके असून, या मार्गावरून जवळपास २ हजार ८५५ लोकल फेऱ्या होतात. या तिन्ही मार्गांवरून दररोज ८0 लाख प्रवाशांचा प्रवास होतो आणि यातून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांची संख्या लक्षणीय असते. हा प्रवास करताना महिला प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला तरीही त्यांच्या सुरक्षेच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष होताना दिसते. मुंबई उपनगरीय रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर हीच परिस्थिती असल्याचे स्पष्ट झाले आहे. (प्रतिनिधी)
एमआरव्हीसी व टिसकडून सर्व्हे करताना स्थानकांचे लेखापरीक्षण, महिलांचे ग्रुप डिक्सशन करण्यात आले. जवळपास एक हजार महिला प्रवाशांना यात सामावून घेत सर्व स्तरावरील महिलांची मते व सूचना जाणून घेण्यात आल्या.
या अहवालात २४ टक्के महिला प्रवाशांनी छळवणूक केली जात असल्याचे म्हटले आहे; तर ७६ टक्के महिला प्रवाशांनी अशा प्रकारचा कोणताही अनुभव आला नसल्याचेही नमूद केले आहे.