मुंबईकरांमध्ये वाढतोय दम्याचा त्रास
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2018 05:56 AM2018-12-05T05:56:26+5:302018-12-05T05:56:45+5:30
मुंबईतील वाढते प्रदूषण आणि अन्य सवयींमुळे मुंबईकरांमध्ये दम्याचा त्रास वाढत असल्याचे निरीक्षण वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी मांडले आहे.
मुंबई : मुंबईतील वाढते प्रदूषण आणि अन्य सवयींमुळे मुंबईकरांमध्ये दम्याचा त्रास वाढत असल्याचे निरीक्षण वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी मांडले आहे. शहर-उपनगरातील चेंबूर, माझगाव, गोवंडी, मानखुर्द अशा काही परिसरांत प्रदूषणाची पातळी वाढत असल्याने दम्याच्या रुग्णांत २५ टक्क्यांनी वाढ झाल्याचेही समोर आले. याशिवाय, १० पैकी सात रुग्णांना दमा नियंत्रणात आणण्यासाठी इन्हेलेशन थेरपीचा वापर करावा लागत असल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे.
दमा हा गंभीर स्वरूपाचा दीर्घकालीन आजार सामान्यत: श्वसनमार्गाला आलेली सूज आणि श्वसनमार्ग रुंद झाल्याने होतो. तज्ज्ञांच्या निरीक्षणानुसार, मुंबईतील स्थानिक डॉक्टर्स दररोज दमा व श्वसनविषयक आजाराने पीडित सरासरी ४० रुग्णांची तपासणी करतात. २० वर्षे वयाच्या आत एक तृतीयांश मुंबईकरांना दमा होण्याचा धोका आहे.
डॉ. सुशांत माने यांनी सांगितले की, दम्याचे निदान झालेल्या मुलांच्या संख्येत वाढ झाली आहे. इन्हेलेशन थेरपी घेणाऱ्या रुग्णांमध्येही ३० ते ४० टक्के रुग्ण मध्येच थेरपी थांबवतात. याबाबत जनजागृती आवश्यक आहे.
>इन्हेलेशन थेरपी म्हणजे काय?
दम्याच्या सर्व उपचारांमध्ये ‘इन्हेलेशन थेरपी’ ही आतापर्यंतची सगळ्यात प्रभावी उपचार पद्धती असल्याचे सिद्ध झाले असून, या पद्धतीमुळे दम्याच्या उपचारांमध्ये क्रांती झाली आहे. मागच्या तीन दशकांपासून ही उपचार पद्धती उपलब्ध झाली असली, तरी मागच्या दशकापासून या उपचार पद्धतीचा सर्वाधिक वापर होत आहे. याशिवाय उपकरणाच्या साहाय्याने दिलेल्या औषधांमुळे श्वसननलिका मोकळी करण्याचे काम याद्वारे करण्यात येते. दम्यावर ‘इन्हेलेशन थेरपी’द्वारे नियंत्रण मिळवता येते.
>दमा वाढण्याची प्रमुख कारणे
वायुप्रदूषण, हवेतील दूषित कण, धूलिकण, धूम्रपान, खाण्याच्या सवयी, पोषण अभाव, आनुवंशिक पूर्वाग्रह आणि पालकांनी केलेले दुर्लक्ष आदी अनेक कारणांमुळे मुंबईकरांमध्ये दमा वाढत आहेत.
>आजाराविषयी जागृती आवश्यक
मुंबईसारख्या शहरात वाहतूककोंडी व इतर आॅटोमोबाइल्समुळे होणारे प्रदूषण, बैठे काम करण्याची जीवनशैली, धूम्रपान आदी दम्याच्या प्रमाणात वाढ होण्यामागील प्रमुख कारणे आहेत. शालेय मुलांमध्ये या आजाराविषयीच्या जनजागृतीवर भर दिला पाहिजे.
- डॉ. निमेश शाह, फुप्फुसविकारतज्ज्ञ