पालिका प्रशासन; दुसऱ्या लाटेच्या नियंत्रणासाठी यंत्रणा सज्ज
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मागील तीन दिवस मुंबईत सातत्याने दरराेज पाच हजारांच्या टप्प्यात काेराेना रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे शहर, उपनगरातील रुग्णालय तसेच कोविड केंद्रांमध्ये रुग्णभरतीचे प्रमाण वाढत असून पालिका प्रशासनाकडून खाटांची क्षमता वाढविण्यात येत आहे. काेेराेनाच्या दुसऱ्या लाटेच्या नियंत्रणासाठी खाटांची क्षमता एक लाखांच्या घरात करण्यासाठी पालिकेचे वेगाने प्रयत्न सुरू आहेत.
मुंबईत ९ विभागातील कोरोना रुग्णवाढीचे प्रमाण दिवसेंदिवस १ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. असे विभाग वाढत असून दररोज ५ हजारांपेक्षा जास्त रुग्णांवर पालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. मुंबईमध्ये ३० हजार ७६० काेराेनाबाधित असून ते पालिकेच्या कोविड केअर सेंटरसह विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. यातील ५१३ रुण गंभीर असून लक्षणविरहित रुग्णांची संख्या २३,१९१ असून, लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या ७ हजार ५६ इतकी आहे.
१ मार्च २०२१ रोजी मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या ९,६९० इतकी होती. मात्र तीच २१ मार्च २०२१ रोजी तब्बल २३,४४८ एवढी झाली. १ मार्चपासून मुंबईतील कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत तब्बल १४२ टक्क्यांनी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. खाटांच्या क्षमतेत वाढ करण्याविषयी अधिक माहिती देताना पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, दैनंदिन रुग्ण निदानात वाढ झाली असली तरी अजूनही नवीन रुग्णांपैकी लक्षणविरहित रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे नव्या रुग्णांपैकी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ४० ते ४५ टक्के आहे. मात्र तरीही खबरदारी म्हणून संसर्ग नियंत्रणाच्या दृष्टीने टप्प्याटप्प्याने खाटांच्या क्षमतेत वाढ कऱण्यात येणार असून याची सुरुवात झाली आहे. मागील काही दिवसांत १० हजार खाटा नव्याने सज्ज करण्यात आल्या असून पालिका प्रशासन संसर्गाला आळा घालण्यासाठी वेगाने प्रयत्न करीत आहे.