एस.टी.च्या मदतीने वाढले 'बेस्ट' प्रवासी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2020 01:54 AM2020-10-09T01:54:37+5:302020-10-09T01:54:50+5:30
दररोज १९ लाख मुंबईकर करतात प्रवास
मुंबई : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्या बेस्टच्या मदतीला धावून आल्या. यामुळे गेल्या १५ दिवसांमध्ये बेस्ट उपक्रमाची प्रवासी संख्या आता १९ लाखांवर पोहोचली आहे.
३ जूनपासून लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर बेस्ट बसमधील प्रवासी संख्या वाढत गेली. तीन महिन्यांत तब्बल १५ लाख प्रवासी वाढले. २१ सप्टेंबरपर्यंत प्रवासी संख्या १६ लाखांपर्यंत पोहोचली.
आतापर्यंत एकूण ४८० एस.टी. बसगाड्या बेस्ट मार्गावर धावतात. यामुळे बेस्टची प्रवासी संख्या आता १९ लाखांपर्यंत पोहोचली आहे. बेस्टच्या मदतीला एक हजार एस.टी. बस दाखल होणार आहेत. आणखी ५२० बस मदतीला लवकरच येतील. एस.टी. बसगाड्या दर किलोमीटरमागे ७५ रुपये भाडेदराने घेण्यात आल्या आहेत. एस.टी. महामंडळाला इंधन, देखभाल, चालक, वाहकाचा खर्च पालिका, बेस्ट देणार आहे.
लॉकडाऊनच्या आधी बेस्ट बसगाड्यांमधून दररोज ३४ लाख प्रवासी प्रवास करीत होते.
लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर तीन महिन्यांत प्रवासी संख्या १५ लाखांवर पोहोचली.
बेस्ट उपक्रमाच्या ३१०० बसगाड्या व एस.टी.च्या बसगाड्यांमधून दररोज १९ लाख प्रवासी प्रवास करतात.